हिंगोली : नांदेड आणि लातूर जिल्ह्यांत मायक्रो फायनान्सच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना ताज्या असतानाच, हिंगोली जिल्ह्यातील वाघजळी (ता. सेनगाव) येथे मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या कथित सक्तीच्या कर्जवसुलीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कर्जाचे हप्ते थकविल्यामुळे होणाऱ्या सततच्या धमक्या आणि अपमानास्पद वागणुकीला कंटाळून गावातील पाच कर्जदार महिलांनी चक्क आपली राहती घरेच विक्रीला काढली आहेत. काही घरांच्या दरवाजांवर ‘मायक्रो फायनान्सचे कर्ज फेडण्यासाठी घर विकणे आहे’ असे फलकही लावण्यात आले आहेत.

राज्यात यंदा दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिक आर्थिक संकटात सापडले आहेत. शेतीतून उत्पन्न मिळत नाही. परिणामी कर्जाचे हप्ते भरणेही अशक्य झाले आहे. अशा परिस्थितीत शासनाने दुष्काळी भागात कर्जवसुलीसाठी सक्ती करू नये, असे निर्देश दिले असतानाही काही मायक्रो फायनान्स आणि खासगी वित्तीय संस्थांकडून वसुलीसाठी दबावतंत्राचा वापर होत असल्याचा आरोप आहे.

वाघजळी गावातील जवळपास ७० ते ८० नागरिकांनी विविध फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेतले आहे. यामध्ये बचत गटांच्या माध्यमातून घेतलेल्या कर्जांसह वैयक्तिक, शेती आणि व्यावसायिक कर्जांचाही समावेश आहे. मात्र, आर्थिक परिस्थिती खालावल्याने कर्जदारांना हप्ते भरणे कठीण झाले आहे. त्यातच वसुलीसाठी येणारे कर्मचारी वारंवार फोन करून धमकावत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. काही वेळा रात्री उशिरापर्यंत कर्जदारांच्या घरात बसून राहण्याचे प्रकारही घडत आहेत.

धम्मरत्न मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मीनाबाई धम्मरत्न मोरे यांच्याकडे ८० हजार ते एक लाख रुपये, रेखाबाई प्रकाश मोरे यांच्याकडे एक ते सव्वा लाख रुपये, नंदाबाई सिद्धार्थ मोरे यांच्याकडे ७० ते ९० हजार रुपये, दीपाली समाधान मोरे यांच्याकडे ९० हजार ते एक लाख रुपये, तर चंद्रभागाबाई संजय मोरे यांच्याकडे ९० हजार ते एक लाख रुपयांचे कर्ज आहे. कर्जफेडीसाठी सातत्याने तगादा लावला जात असल्याने या महिलांनी राहती घरे विक्रीला काढल्याचे समोर आले आहे.

दिव्यांग कर्जदारही वसुलीच्या जाचात

“वर्षभरापूर्वी विदर्भातील एका फायनान्स कंपनीकडून दोन लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. मी दिव्यांग असून, दुष्काळामुळे सध्या उत्पन्नाचे कोणतेही साधन राहिलेले नाही. तरीही कंपनीचे कर्मचारी रात्री नऊ वाजेपर्यंत घरी येऊन बसून राहतात. गावातील ७० ते ८० महिलांनी विविध फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेतले आहे. दुष्काळी परिस्थितीत हप्ते भरणे शक्य नसतानाही वसुलीसाठी दबाव आणला जात आहे,” अशी व्यथा धम्मरत्न मोरे यांनी मांडली.

अभिलेखे सादर करण्याचे निर्देश

दरम्यान, या प्रकरणाची दखल घेत जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने जिल्ह्यातील मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून कर्जवाटप आणि वसुलीविषयक माहिती मागविली आहे. कंपन्यांनी किती कर्जवाटप केले, कोणत्या नियमांनुसार कर्ज दिले आणि वसुलीची पद्धत काय आहे, यासंदर्भातील अभिलेखे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नियमांचे उल्लंघन किंवा कर्जवसुलीसाठी सक्तीचा अवलंब होत असल्याचे आढळल्यास तत्काळ कारवाई केली जाईल, असे जिल्हा उपनिबंधक सुरेखा फुपाटे यांनी स्पष्ट केले आहे.

‘‘ वागजळी गावातील काही महिलांनी कर्ज घेतले होते. ते वसूल करण्यासाठी त्रास होत असल्याने त्यांनी घर विक्रीला काढले आहे, अशी माहिती कळाल्यानंतर सोमवारी या कंपन्यांच्या प्रतिनिधींबरोबर बैठक घेणार आहे. यातून कसा मार्ग काढता येईल ते ठरवू.- राहुल गुप्ता, जिल्हाधिकारी, हिंगोली