छत्रपती संभाजीनगर – शक्ती, वेग आणि उत्साह, असे वर्णन आयुर्वेदामध्ये ज्या प्राण्याचे केले गेले आहे, त्या अश्व-घोड्यावरची रपेट ही वैद्यकीय दृष्टिकोनातून दोन प्रमुख महत्त्वाच्या आजारांमध्ये लाभदायक ठरत असल्याचा दावा करण्यात येत आहे. घोडयापासून देण्यात येणारी हिप्पोथेरपी ही वेगळी उपचार पद्धती प्रचलित असली तरी घोडेस्वारी रपेटीनंतर हृदयविकार आणि मूळव्याधीच्या (पाईल्स) रुग्णांना त्यांच्या आजारात फायदा होत असल्याचे अनुभव समोर येत आहेत. रशियामधील घोडेस्वारीला एक छंद, शौक सोबत आरोग्याचीही जोड असल्याचे सांगण्यात येते. जर्मनी, ऑस्ट्रिया, स्वीडनसारख्या देशांमध्ये घोड्याचा उपचार पद्धतीमध्ये वापर केला जातो.

घोडेस्वारीबद्दलचे अनुभव सांगताना वयाची ७५ वर्षे पार केलेले डॉ. सुरेशचंद्र चौधरी सांगतात की, रपेटीनंतर हृदयावर ताण येत नाही. सामान्यतः धावल्यानंतर किंवा चालल्यानंतर हृदयाची स्पंदने वाढतात. परंतु घोडेस्वारीनंतर स्पंदने आणि श्वासोच्छवासाची क्रिया, यांच्या गतीमध्ये वाढ होत नाही. त्याचा दुसरा अर्थ हृदयावर ताण (लोड) येत नाही. तुमचा उत्साह टिकून राहतो. त्याचा दुसरा अर्थ थकवा येत नाही. श्वासांची प्राणायामासारखी क्रियाही घडते. म्हणूनच घोड्यालाच शक्ती, वेग व उत्साहाचे प्रतीक मानले आहे. “हॉर्स पॉवर” ही उपमाही प्रचलित झाली आहे. घोड्यावरील रपेट हा हृदयविकाराचा आजार असलेत्यांसाठी एक उत्कृष्ट व्यायाम आहे. पूर्ण शरीराच्या हालचालींमुळे हृदयावरील रक्तवाहिन्यांमधील रोध-अडथळे (ब्लॉक) निघून जाऊ शकतात !

डॉ. सुरेशचंद्र चौधरी हे १९६५ सालचे एमबीबीएस डॉक्टर आहेत. त्यांचे वैद्यकीय शिक्षण कर्नाटकातील धारवाड विद्यापीठाच्या गुलबर्गा येथील महादेव अप्पा रामपुरे मेडिकल कॉलेजमधून झाले. त्यानंतर त्यांनी १९७६ मध्ये परळी वैजनाथ येथे वैद्यनाथ क्लिनिक उघडून रुग्णसेवेला सुरूवात केली. डॉ. चौधरी यांनी करोनाकाळात वयाच्या सत्तरीमध्येही तोंडाला मुखपट्टी न लावता हजारो रुग्णांवर ५० रुपयांच्या माफक दरात उपचार केले. त्यांना परळीभूषणसह विविध पुरस्कार, रंभापुरी येथील जगदगुरुंनी “शिवाव्दैईत भास्कर” आदी उपाधी देऊन गौरवण्यात आले आहे. डॉ. चौधरी अश्वविद्यानिपुण असून, रंगनिहाय घोड्याचे नाव असावे, याची माहितीही त्यांना आहे. त्यांनी नांदेडच्या गुरुव्दारातील “मारवन” नावाच्या मस्तवाल, उन्मत्त घोड्याला काबूत आणले होते. छत्रपती शिवाजी महाराजांची “कल्याणी” नावाची घोडी, महाराणा प्रताप यांचा “चेतक”, रघुनाथराव पेशव्यांनी भीमपट्टी सोकावर घोड्यावरून अटकेपार लावलेल्या झेंड्यासह देश-विदेशातील विविध अश्व प्रजाती प्रकारांचीही माहितीही डॉ. चौधरींकडे आहे. त्यांच्याकडील “मयूर” नावाच्या घोड्याला खरेदी करण्यासाठी विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी राज्यमंत्री शिवाजीराव पंडित, काँग्रेसचे परभणीतील नेते आमदार सुरेश वरपूडकर यांनीही माळेगावच्या यात्रेत मागणी घातलेली होती. परंतु किमतीमध्ये “मयूर”चा व्यवहार फिस्कटला. अर्थात अजित पवारांनी “मयूर”साठी मागणी घातली तेव्हा ते राज्यात राज्यमंत्री तर त्यांचे काका शरद पवार हे केंद्रात संरक्षणमंत्री असतानाचा काळ होता.

Award Banner

या अर्थाने अश्वविद्यानिपुण डॉ. चौधरी यांच्या मते, घोडेस्वारी ही मूळव्याधीच्या रुग्णांसाठीही अत्यंत फायदेशीर आहे. घोड्यावर बसल्यामुळे पार्श्वभागी एक दाब तयार होऊ लागतो. तो आल्हाददायी हादरे, आदळल्यामुळे, त्या भागातील नसांवर परिणाम होऊन त्या मोकळ्या होतात. मूळव्याधीमध्ये शिवणीमध्ये टोचल्यासारखी वेदना होते, तीही थांबते. त्यामुळे घोडेस्वारी ही आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असून, आजही आपण वयाच्या ८० च्या टप्प्यात दोन-पाच किलोमीटरची रपेट मारतो. घोडा सांभाळणे खर्चीक असल्याचा मोठा गैरसमज आहे. परंतु आरोग्य आणि स्वतः, मित्र कंपनीवर चहापान व इतर शौक आदी खर्चाचा विचार केला तर २०० रुपये रोज, महिना पाच-सहा हजार आजच्या तुलनेत खर्चीक आहे, असे मला वाटत नाही, असे डॉ. चौधरी सांगतात.

सकारात्मक ऊर्जा परिवर्तीत

घोड्यांना फारसा दम लागत नाही. एक सकारात्मक जशी इतरत्र परिवर्तीत होते, तसाच उत्साह छोडेस्वारी करणाऱ्यांना येतो, असे काहींना अनुभव येतात. हृदयरोग तज्ज्ञांचा सल्ला घेऊनही काही जण घोडेस्वारी करतात. – डॉ. अब्दुल मोईज सिद्दीकी, पशु शल्य चिकित्सक, छत्रपती संभाजीनगर

चांगला व्यायाम असल्याच्या नोंदी

घोडेस्वारी ही हृदयरुग्णांसाठी मध्यम स्वरूपाचा चांगला व्यायाम आहे. स्पंदनं (हार्टरेटिंग) आणि रक्तदाब व हार्ट व्हेरियाब्लिटी यांचे चांगले परिणाम दिसून आलेले आहेत. हृदयरोगी रुग्णांना तोल सांभाळण्याचा सरावही होतो. घोडेस्वारी व हृदयरोगावर फार मोठा अभ्यास झालेला नसला तरी लहान-लहान अभ्यासातून वरील निरीक्षणे नोंदविली गेली. परदेशात कृत्रिम पद्धतीने घोडेस्वारी करूनही नोंदी घेतलेल्या आहेत. – डॉ. अजित भागवत, ज्येष्ठ हृदयरोग तज्ज्ञ