दुष्काळामुळे भूजलपातळीत मोठय़ा प्रमाणावर घट झाली आहे. पाण्याचे स्रोत कोरडे पडू लागल्याने पाणी आणायचे कोठून? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शासकीय रुग्णालयांनाही पाणीटंचाईची झळ सहन करावी लागत आहे. पाण्याचा हौद कोरडा ठणठणीत असून जारमध्येही पाणी नसल्याने रुग्णांच्या नातेवाइकांना परिसरातील हॉटेल धुंडाळण्याची वेळ आली आहे. वापरासाठीच्या पाण्याचीही काटकसर करावी लागत आहे. रुग्णालयाच्या धोबीघाटातही पाणी नसल्याने वॉर्डातील कपडे धुण्यास अडचणी येत आहेत. येत्या काही दिवसांत पाण्याअभावी शस्त्रक्रिया रखडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यात भूजल पातळी खोलवर गेली आहे. पाणीटंचाईने आरोग्यसेवाही प्रभावित झाली असून बहुतांश ग्रामीण रुग्णालयांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. बीडच्या शासकीय रुग्णालयास पाणीपुरवठा करणाऱ्या िवधनविहिरीने तळ गाठण्यास सुरुवात केल्याने पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. दैनंदिन वापरासाठी सरासरी तीस हजार लिटर पाणी रुग्णालयास लागते. मात्र, सध्या गरजेपेक्षा अध्रेही पाणी मिळत नसल्याने अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. येत्या काही दिवसांत टंचाईचे संकट अधिकच गडद होणार असून, रुग्णालयात होणाऱ्या शस्त्रक्रियाही रखडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
रुग्णालयाच्या धोबीघाटात सध्या पाण्याची टंचाई भासू लागली आहे. मुबलक पाणीसाठा नसल्याने आहे त्याच पाण्यात कपडे धुण्याची वेळ आली आहे. पाण्याअभावी वॉर्डातील कपडे वेळेवर देता येत नाहीत. िवधनविहीर कोरडी पडल्यास कपडे धुलाई विभागाला कात्री लावली जाऊ शकते. तसेच स्वच्छतेवरील पाण्याचा वापर कमी केला जाण्याची शक्यता आहे. रुग्णालय परिसरात असलेली पाण्याची टाकी कोरडीठाक पडल्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांना भटकंती करावी लागत आहे. रुग्णालयाच्या आवारातच पाण्यासाठी जारची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, दोन दिवसांपासून त्याही रिकाम्या आहेत. रुग्णांसाठी नातेवाइकांकडून १५ ते २० रुपये देऊन पिण्याचे पाणी खरेदी केले जात आहे. रुग्णालय प्रशासनाने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी रुग्णांच्या नातेवाइकांतून केली जात आहे.