औरंगाबाद – गुटख्याचा साठा करून विक्री करणाऱ्याच्या घरात छापा मारून गुटखा व कारसह २१ लाख ३७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी ही कारवाई मुकुंदवादी भागातील इंदिरानगरात केली. पोलिसांनी शेख हबीब शेख मदन (३६), शेख यासीन शेख फत्तु (४३) आणि मोहसीन मुमताज खान (२५, तिघेही रा. इंदिरानगर) यांना अटक केली आहे. तर अशफाक तांबोळी (रा. जालना) असे पुरवठा करणाऱ्याचे नाव असल्याची माहिती चाैकशीत पुढे आली आहे.

पोलीस उपनिरीक्षक कल्याण शेळके यांनी पथकासह हबीबच्या घरावर छापा मारला. तेव्हा शेख हबीब, शेख यासीन आणि मोहसीन खान तिथे मिळून आले. तसेच घराच्या झाडाझडतीत रॉयल ७१७ तंबाखु, हिरा पान मसालाचा मोठा साठा आणि गुन्ह्यात वापरलेली कार (एमएच- २०-बीवाय- ९६४६) असा २१ लाख ३७ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. जप्त माल मुकुंदवाडी पोलिसांच्या स्वाधीन करून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.