छत्रपती संभाजीनगर : वैजापूर रोडवरील खोजेवाडी शिवार भागात टँकरमधून गॅस काढून व्यावसायिक सिलिंडर भरणाऱ्या टोळीवर नागरी पुरवठा विभागाचे संचालक चंद्रकांत डांगे आणि जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांच्या पथकाने कारवाई केली. या संयुक्त मोहिमेत अवैध गॅस चोरी उघडकीस आली. या कारवाईत एक कोटी २६ लाख ८७ हजार ९९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
शिधावाटप नियंत्रकांकडे गॅस टँकरमधून चोरी करुन गॅस चोरी होत असल्याची माहिती मिळाली होती. ०२ एप्रिल रोजी रात्री ९:४५ वाजेच्या सुमारास गंगापूर तालुक्यातील हॉटेल साई यशच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत व्यावसायिक सिलिंडर भरले जात असल्याचे दिसून आले. दोन एलपीजी टँकरमधून अवैधरीत्या पाईपच्या सहाय्याने व्यावसायिक गॅस सिलिंडर भरले जात असल्याचे दिसून आल्यानंतर संयुक्त पथकातील सदस्यांनी छापा टाकला. टँकर चालकांना जागीच ताब्यात घेण्यात आले.
या कारवाईत दोन एलपीजी टँकर क्र. एमएच – ४३ सीके- ५९२१ आणि एमएच – ४३ सीके- ५७४७ जप्त करण्यात आले. या टँकरची किंमत एक कोटी पाच लाख रुपये असून टॅकरमध्ये ३५,२२० किलो गॅस असावा असा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. या गॅसची किंमत २०.०४ लाख रुपये एवढी आहे. या कारवाईत व्यावसायिक वापराचे १७ भरलेले आणि ६ रिकामे सिलिंडर, तसेच काही घरगुती आणि ५ किलोचे छोटे सिलिंडर जप्त करण्यात आले. टँकरमधून गॅस काढण्यासाठी व सिलिंडर भरण्यासाठी चार विशेष व्हॉल्व्हचे रबरी पाईप आढळून आले.
या कारवाईत सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी संदीप विश्वनाथ शिंदे यांच्यासह पथकातील सागर सिंगल, हिदायत खान, इरफान पटेल, अमोल कासार, संदीप मोरे, पांचाळ, रामेश्वर लोखंडे यांनी कामगिरी बजावली. या प्रकरणात टँकर चालक श्रीकृष्ण सखाराम दहिफळे, मिराज मो. जैश खान, व्यवसायाचा मालक महेश विष्णू थोरात आणि टँकर मालक श्रीहर छेदी यांच्याविरुद्ध ‘जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५’ आणि ‘एलपीजी पुरवठा व वितरण आदेश २०००’ च्या विविध कलमान्वये एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे, वाळूज येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर करीत आहेत.
