१ जूनपासून उपोषण
सोनपेठ तालुक्यातील सायखेडा येथील महाराष्ट्र शेतकरी शुगरकडील शेतकऱ्यांची थकीत रक्कम मिळावी, यासाठी किसान सभेतर्फे १ जूनपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र शेतकरी शुगर लि. या कारखान्यास परभणी, जालना, लातूर, बिदर आदी जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी २०१५-२०१६मध्ये हजारो मेट्रिक टन ऊस दिला. परंतु कारखान्याने अजून या शेतकऱ्यांना पहिला हप्ताही दिला नाही. एफआरपी दूरच, कारखान्याकडे ४ कोटी २२ लाख ४७ हजार एफआरपी देयकाची थकीत बाकी आहे. अनेक शेतकऱ्यांना पहिला हप्ताही मिळाला नाही. ५ व १३ मे रोजी परतूर व औराद (जिल्हा बीदर) येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यावर जिल्हाधिकारी महिवाल यांनी बठक घेतली. बठकीत शेतकऱ्यांनी २० मेपर्यंत बिल देण्याची मागणी केली होती. त्यानुसार शुक्रवारी शेतकऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड यांची भेट घेतली.