scorecardresearch

‘भूकबळी ही देशातील मोठी शोकांतिका’

स्वातंत्र्यानंतर पासष्ट वर्षांपेक्षा अधिक मोठा कालखंड उलटला तरी आपल्या देशात असंख्य लोकांचे अन्नाअभावी बळी जातात ही मोठी शोकांतिका आहे, असे प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश आमटे यांनी येथे सांगितले.

स्वातंत्र्यानंतर पासष्ट वर्षांपेक्षा अधिक मोठा कालखंड उलटला तरी आपल्या देशात असंख्य लोकांचे अन्नाअभावी बळी जातात ही मोठी शोकांतिका आहे, असे प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश आमटे यांनी येथे सांगितले. मैत्र मांदियाळी प्रतिष्ठान, दीपक हॉस्पिटल आणि समर्पण ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रकट मुलाखतीत उत्तर देताना ते बोलत होते.
एखाद्या व्यक्तीला भूकबळी जाणे ही बाब संपूर्ण समाजासाठीच वेदनादायी असली पाहिजे. भूकबळी रोखण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. समाजात वेदनेशी नाते जोडण्यास आम्हाला बाबांना शिकवले. श्रमाचे संस्कारही त्यांच्यामुळेच अनेकांवर झाले. त्यांच्या शिकवणीमुळेच आपण पत्नीसह गेल्या ४० वर्षांपेक्षा अधिक काळ हेमलकसा आणि परिसरातील आदिवासींमध्ये कार्य करीत आहोत, असे प्रकाश आमटे यांनी सांगितले. यावेळी बोलताना डॉ. मंदा आमटे म्हणाल्या की, आदिवासी समाजात स्त्रियांना पुरुषापेक्षा अधिक सन्मानाचे स्थान असते.
बीड जिल्ह्य़ातील आर्वी येथील ‘शांतिवन’चे संस्थापक दीपक नागरगोजे या कार्यक्रमात ‘तरुणाईच्या वेगळ्या वाटा’ या विषयावर बोलताना म्हणाले, मानवी जीवनात अनेकविध योजना असल्या तरी त्यांचा बाजार मांडण्याऐवजी त्यामधून मार्ग काढणे शिकण्यातच खरे शहाणपण आहे. आपण स्थापन केलेल्या शांतिवनात उपेक्षित घटकांतील अडीचशेपेक्षा अधिक मुले शिक्षण घेत आहेत. ‘मैत्र मांदियाळी’च्या वतीने एक लाख रुपये मदतीचा धनादेश यावेळी नागरगोजे यांना देण्यात आला. मतीन भोसले यांनी विपरीत परिस्थितीत फासेपारधी जमातीमधील मुलांसाठी सुरू केलेल्या शाळेची माहिती दिली. वंचितांना शिक्षणाच्या प्रवाहात सहभागी करवून घेण्याची आवश्यकता व्यक्त करून त्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न झाले पाहिजेत, असे ते म्हणाले. ‘मैत्र मांदियाळी’चे अजय किंगरे यांनी प्रारंभी प्रास्ताविक केले.
तत्पूर्वी डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदा आमटे यांच्या सामाजिक कार्याचा दीपक हॉस्पिटलमधील छोटेखानी कार्यक्रमात गौरव करण्यात आला. माजी मंत्री डॉ. शंकरराव राख यांनी आमटे दाम्पत्याचे स्वागत करून सत्कार केला. डॉ. संजय राख, डॉ. अनुराधा राख यांची प्रमुख उपस्थिती यावेळी होती.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-02-2016 at 01:30 IST

संबंधित बातम्या