scorecardresearch

‘लगीनघाई’मधून कुटुंबातील ज्येष्ठ फसवणुकीच्या चक्रात

मुला-मुलींना अनुरूप जोडीदार शोधण्यासाठी आसुसलेल्या कुटुंबातील ज्येष्ठांना सध्या बनावट वधू-वर सूचक मंडळांकडून सुंदर-सुंदर चेहऱ्यांचे छायाचित्र पाठवून लग्न स्थळे पाठवण्याच्या नावाखाली फसवण्याचे प्रकार वाढले आहेत.

लग्नाआधी विवाह समुपदेशनाचा हा ट्रेंड मेट्रो शहरांमध्ये झपाट्याने वाढत आहे.

बिपीन देशपांडे

औरंगाबाद : मुला-मुलींना अनुरूप जोडीदार शोधण्यासाठी आसुसलेल्या कुटुंबातील ज्येष्ठांना सध्या बनावट वधू-वर सूचक मंडळांकडून सुंदर-सुंदर चेहऱ्यांचे छायाचित्र पाठवून लग्न स्थळे पाठवण्याच्या नावाखाली फसवण्याचे प्रकार वाढले आहेत. पाच ते दहा हजार रुपयांपर्यंतचीच असलेली ही रक्कम अक्कलखात्यात टाकूून फसवणुकीवर स्वत:कडूनच पांघरूण ओढून घेतले जात असल्याने पोलिसांपर्यंत तक्रारी दाखल होत नाहीत. औरंगाबादमधील एका निवृत्त अधिकाऱ्याला तब्बल लाखो रुपयांना फसवण्यात आले असून केवळ त्याची वाच्यता झाली, तर समाजात बदनामी होण्याच्या भीतीने तक्रार दाखल करण्यात आली नसल्याची माहितीही समोर येत आहे. वधू-वर सूचक मंडळांनाही शासकीय कार्यालयात नोंदणी करणे अनिवार्य असताना तसे न करताच व्यवसाय घरा-घरांमध्ये थाटला जात आहे. अनेक जण घरबसल्या आणि कमी भांडवलाची गुंतवणूक असलेल्या या व्यवसायात उतरले आहेत. त्यांच्याकडून हजार-पाचशे रुपयांत स्थळे मोबाइलवर पाठवले जातात. मात्र, शासकीय कार्यालयात रीतसर संस्थेची नोंदणी करून क्रमांक मिळवला जात नाही. त्यातही अनेक नियमांची पूर्तता झाली, तरच महानगरपालिकास्तरावर आरोग्य विभागाकडून नोंदणीकृत प्रमाणपत्र अदा केले जाते. असा नोंदणी क्रमांक आणि आधारक्रमांक स्थळ सुचवणाऱ्यांना मागितले तर फसवणुकीच्या प्रकारावर अंकुश बसेल, असे अधिकृत मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

समाज माध्यमावरील विविध गटांमधून किंवा उपवर-वधू वरांच्या पालकांची माहिती घेऊन त्यांच्याशी संपर्क करणारे अनेक फोन मुंबई, पुणे, सोलापूर, नागपूरचे नाव घेऊन केले जातात. त्यांना सुंदर मुला-मुलींचे छायाचित्र पाठवून लग्नस्थळाची माहिती दिली जाते. त्यांच्याकडून एका बँक खात्यावर १० हजार रुपयांपर्यंतची रक्कम जमा करण्यास सांगितले जाते. समोरून एका गोड मुलगा किंवा मुलीच्या येणाऱ्या आवाजावर भाळून रक्कम जमा केली जाते. त्यानंतर संबंधितांकडून फोन बंद करून ठेवला जातो. किंवा ज्यांना स्थळ पाठवले त्यांचे फोन येण्याचा मार्ग बंद केला जातो. दुसऱ्या एखाद्याच्या फोनवरून संपर्क केला तर तोही बंद केला जातो. सर्वसामान्य माणसाला फसवण्यात आल्याचे लक्षात येते आणि प्रकरण घरातल्या घरातच संपवले जाते. तीन ते पाच हजार किंवा दहा हजारांच्या आतील रक्कम असल्याने पोलिसांपर्यंत प्रकरण पोहोचवले जात नाही. औरंगाबादेत अलिकडेच पत्नी मृत्यू पावलेल्या एका निवृत्त अधिकाऱ्याला लाखो रुपयांना फसवण्यात आले आहे. मुला-मुलींना कळू नये आणि समाजातही बदनामी होईल म्हणून तक्रार दाखल करण्यात आली नाही. मात्र, अशा प्रकारातून फसवणाऱ्यांची हिंमत वाढेल आणि अनेक जण बळी पडतील. त्यांच्यासाठी का होईना फसगत झालेल्या कुटुंबीयांनी तक्रारीसाठी पुढे आले तर बनावट वधू-वर सूचक मंडळांपर्यंत पोहोचता येईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

मुंबईतही मध्यंतरी गल्लोगल्ली वधू-वर सूचक मंडळे सुरू असल्याचा प्रकार समोर आला होता. मुंबई महानगरपालिकेने कार्यक्षेत्रातील मंडळांची विवाह निबंधकांकडे नोंदणी करण्याची जबाबादारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी, सहायक आरोग्य अधिकारी, उपकार्यकारी आरोग्य अधिकाऱ्यांवर सोपवली होती. अनेक मंडळांना कारणे दाखवा नोटिसही बजावली आहे. या पाश्र्वभूमीवर विचारले असता औरंगाबाद मनपाच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले की, विवाह मंडळांना नोंदणीसाठी सुलभ व्यवस्था आहे. वॉर्ड, केंद्रस्तरावर ही यंत्रणा असून तेथेही नोंदणीसाठी अर्ज करता येतो. वैद्यकीय अधिकारी सर्व कागदपत्रांची पडताळणी करूनच विवाह मंडळांना प्रमाणपत्र दिले जाते.

औरंगाबादेतून सध्या दिवसभरात किमान एकदोन तरी फोन फसवणूक झाल्याच्या संदर्भाने हमखास येतात. स्थळ सुचवण्याच्या नावाखाली संपर्क करणाऱ्यांना त्यांची संस्था नोंदणीकृतचा क्रमांक किंवा आधारकार्डची प्रत मोबाइलवर मागवून घेतली तर फसवणाऱ्यांची माहिती काढता येऊ शकेल. नोंदणी क्रमांक मागवूनच पुढील व्यवहार करावा.

– शंतनु चौधरी, अध्यक्ष, वधू-वर सूचक मंडळ.

पीडितांनी तक्रार नोंदवली तर इतरांची फसवणूक टळेल. थेट तक्रार देता येत नसेल तर ‘सायबरक्राइम डॉट गव्ह डॉट इन’ या संकेतस्थळावरही तक्रार नोंदवता येऊ शकते. त्याची माहिती राज्य आणि केंद्र स्तरावर जाऊन दखल घेतली जाते. फसवणूक झालेल्यांनी लहान रक्कम असली, तरी तक्रार नोंदवण्यासाठी पुढे यावे.

– आमोल सातोदकर, सहायक पोलीस निरीक्षक, सायबर क्राइम.

मराठीतील सर्व औरंगाबाद ( Aurangabad ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Husband wife family fraud marriage ysh

ताज्या बातम्या