छत्रपती संभाजीनगर – शुद्ध तुपात गव्हाचा जाड रवा (दलिया) सामीष (मांसाहार), खास हैदराबादी मसाले मिश्रीत मिळून तब्बल १५ तास घोटून-घोटून केलेल्या ‘हरीस’या पदार्थाला सध्या रोजेदारांची सर्वाधिक पसंती मिळत आहे. रमजानचा उपवास सोडल्यानंतरच्या पूर्ण जेवणासाठीचा पदार्थ म्हणून आेळख असलेला हरीस हा तयार करणारे शंभरपेक्षा अधिकच्या संख्येने खास शेप (आचारी) सहकाऱ्यांचा चमू घेऊन हैदराबादेतून येथे दाखल झालेले आहेत. हरीस तयार करणारा एक शेप महिन्याकाठी ५० ते ६० हजार रुपये मेहताना घेतो आहे.

शहरात सध्या हरीस तयार करणाऱ्या ठिकाणांच्या संख्येत मागील काही वर्षांपासून वाढ झाली आहे. २५ ते ५० पेक्षा अधिक भागांमध्ये हरीस तयार करणारी हाॅटेल्स सुरू असून, रोषनगेट परिसरातच चार ते पाच दुकाने आढळून येतात. बुढ्ढीलेन, कटकट गेट, चंपाचौक अशा काही मुस्लिम बहुल भागात हरीसची दुकाने

या व्यवसायात स्थानिक काही व्यक्ती वर्षातील एकाच महिन्यासाठी उतरतात. एरव्ही ते ११ महिने दुसरीकडे काम करतात. यातील रोषनगेटजवळील मिर्झा नवीद यांनी सांगितले की, दररोज ५० किलोपर्यंत हरीस तयार केले जाते. त्यात २० किलो दलिया आणि ३० किलो मांस. यामध्येही कोंबडी व बकऱ्यांचे वेगवेगळे असते. या पदार्थाची वेगवेगळ्या पातळ्यांवर १५ तास तयारी करावी लागते. दलियाला दोन-तीन तास घोटावे लागते. तसेच मांसालाही. मांस पूर्णपणे हाडमुक्त असते. दलिया व मांस एक जीव होईपर्यंत पुन्हा घोटावे लागते. शुद्ध तुपामध्ये वरील दोन्ही पदार्थ व खास हैदराबादेतून आणलेले मसाले टाकून हा पदार्थ केला जातो. मसाले तेलकट नसून, उलट त्यातून अधिक जीवनसत्त्वच मिळणारे आहेत. हरीसचा खास रवाही सध्या बाजारात उपलब्ध असल्याचे मिर्झा यांनी सांगितले.

घोटून शिजवण्यात येणाऱ्या हरीससाठी मोगलाई पद्धतीचे खास पसरट मोठे भांडे असून, त्याला देख किंवा बारदाणा म्हटले जाते. या पदार्थासाठी एक विशिष्ट भट्टी तयार केली जाते. त्याला तंदूर म्हणतात. ही भट्टी काळ्या जमिनीच्या मातीपासून तयार केली जाते. या भट्टीतील आग सरपणाची असून, भांड्यातील पदार्थ घोटण्यासाठी सहा ते आठ फूट लांब मोठी उलथणे असतात. पाच ते सहा माणसे केवळ घोटण्याचेच काम करतात. हरीसचा दर ८० ते १०० रुपये लहानसे ताट (प्लेट), असा आहे. याशिवाय कुटुंबासाठीचे एक मोजमाप असलेले दरही आहेत. रमजानचा रोजा फलाहाराने सोडल्यानंतर रात्रीच्या वेळी पूर्ण जेवण घेण्यासाठी शहरातील रोजेदार हरीसला पसंती देत असून, त्यामुळे मागील काही वर्षांपासून हरीस तयार करणाऱ्या दुकानांची संख्या वाढत आहे.