scorecardresearch

मराठवाडय़ातील डॉक्टरांचे आदर्श शिक्षक डॉ. आर. बी. भागवत यांचे निधन

औरंगाबादच्या आरोग्य क्षेत्रात ४० वर्षांपासून अत्यंत सचोटीने काम करणारे डॉक्टर अशी ओळख असणारे डॉ. रघुनाथ भास्कर भागवत यांचे  सोमवारी पहाटे निधन झाले.

औरंगाबाद : औरंगाबादच्या आरोग्य क्षेत्रात ४० वर्षांपासून अत्यंत सचोटीने काम करणारे डॉक्टर अशी ओळख असणारे डॉ. रघुनाथ भास्कर भागवत यांचे  सोमवारी पहाटे निधन झाले. मृत्युसमयी ते ९२ वर्षांचे होते. १९५८ ते १९८४ या कालावधीपर्यंत वैद्यकीय महाविद्यांलयामध्ये प्राध्यापक, औषध वैद्यक शास्त्राचे विभागप्रमुख म्हणून काम करणाऱ्या डॉ. रघुनाथ यांनी मराठवाडय़ात अनेक डॉक्टर घडविले. सामाजिक विषयांवर तसेच राजकीय भाष्य करताना स्पष्ट भूमिका घेणारे डॉक्टर अशी त्यांची ओळख होती. औरंगाबाद येथील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अजित भागवत यांचे ते वडील होत.   मध्यप्रदेशातील इंदोर येथे २० ऑगस्ट १९३० साली जन्मलेल्या आर. बी. भागवत हे औरंगाबाद शहरातील सार्वजिक कार्यक्रमांना आवर्जून हजेरी लावत. अनेकदा ते सायकलवर अशा कार्यक्रमांना येत. १९६१ साली ते पुण्याहून औरंगाबाद येथे आले.

वैद्यकीय महाविद्यालयात काम करताना त्यांच्या सचोटी व प्रामाणिकपणाचे आदर्श आजही सांगितले जातात. त्यांनी बी.जे मेडिकल कॉलेज, पुणे येथील ससून रुग्णालयात तसेच औरंगाबाद व नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयातही प्राध्यापक म्हणून नोकरी केली. १९९० पासून औरंगाबाद येथील कमल नयन बजाज रुग्णालयात त्यांनी विश्वस्त म्हणूनही काम केले. शालेय व महाविद्यालयीन काळात ते विविध परीक्षांमध्ये तर अव्वल होतेच याशिवाय कुस्तीमध्येही ते अव्वल होते.

१९८०- ८१ साली त्यांना शैक्षणिक व सामाजिक कामातील उल्लेखनीय कामांबद्दल शिक्षक पुरस्कारही मिळाला होता. मराठवाडय़ातील वैद्यकीय शिक्षणासह अनेक बदलाचे ते साक्षीदार होते. योग्य निदान करण्याविषयी त्यांची ख्याती होती. वैद्यकीय व्यावसाय करणारा डॉक्टर या ओळखीपेक्षाही वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील आदर्श शिक्षक अशी त्यांची ओळख अनेकांच्या मनात होती. साहित्य, संगीत अशा कलाप्रांतातील संवेदनशील माणसांची मैत्री करणारे डॉ. भागवत यांच्या निधनामुळे वैद्यकीय क्षेत्रातील स्थित्यंतरांचे तपशील माहीत असणारा तज्ज्ञ हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

मराठीतील सर्व औरंगाबाद ( Aurangabad ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ideal teacher r b bhagwat passes away ysh

ताज्या बातम्या