परभणी: येथील कोतवाली पोलिस ठाणे हद्दीतील गंगाखेड रस्त्यावरील एसटी वर्कशॉप परिसरात परभणीच्या दिशेने येणाऱ्या अवैध वाळू वाहतुकीच्या टाटा हायवा वाहनास मंगळवारी(दि. ३)रात्री पोलिसांनी ताब्यात घेऊन चालक व मालकाविरूद्ध कोतवाली पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

कोतवाली पोलिसांचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्वजित कासले यांच्या आदेशान्वये पोलिस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यांची माहिती काढण्याकामी पोलिस अंमलदार प्रेमदास चव्हाण, पोलिस हवालदार गौस, निळेकर असे मिळून गंगाखेड रस्ता परिसरात गस्त घालीत असताना बुधवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास एक संशयित हायवा वाहन गंगाखेडकडून परभणीच्या दिशेने भरधाव वेगाने येताना दिसून आले.

या हायवा वाहनास शांतिनिकेतन कॉलनी परिसरात थांबवून पाहणी केली असता त्यात वाळू आढळून आली. याबाबत हायवा चालक संजय लक्ष्‍मण हारगांवकर(वय २३)रा. लोहगाव ता. परभणी यास विचारले असता वाळू वाहतुकीचा परवाना नसल्याचे सांगितले. तसेच हायवा मालक मोहित वाघ (वय २०)रा. ब्राह्मणगाव ता. परभणी याच्या सांगण्यावरून परभणी शहरात अवैध रेती विक्रीसाठी आल्याची माहिती दिली.

यावरून हायवा क्रमांक – एमएच ४५ १२४९ आणि त्यातील अंदाजे पाच ब्रास अवैध विक्रीची वाळू जप्त करण्यात आली. या कारवाईत अंदाजे १० लक्ष रुपयाचा टाटा कंपनीचा हायवे आणि २५ हजार रुपयांची अंदाजे पाच ब्रास वाळू असा एकूण १० लक्ष २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलिस अंमलदार यांच्या फिर्यादीवरून हायवा चालक संजय हारगांवकर (रा. लोहगाव ता. परभणी) आणि हायवा मालक मोहित वाघ (रा. ब्राह्मणगाव ता. परभणी) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कायद्याच्या विविध कलमान्वये कोतवाली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलिस अंमलदार पवनकुमार निळेकर हे करीत आहेत.