छत्रपती संभाजीनगर: बीड जिल्ह्यातील गुंडगिरी मोडीत काढण्याचे काम सध्या वेगाने सुरू आहे. याअंतर्गत वाल्मीक कराडसह चार टोळ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, मागील पाच महिन्यांत ११ पोलिसांना निलंबित केले आहे. त्यातील दोघांचे निलंबन दोन महिन्यांतच मागे घेण्यात आले आहे, तर दोन पोलीस अधिकाऱ्यांसह चौघांना बीडच्या पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आले आहे. बीड पोलीस अधीक्षक कार्यालयातून ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.
बीड पोलीस अधीक्षकांकडून सुरू असलेल्या या कारवाईमध्ये परळीतील फड टोळीवर रविवारी मकोका कायद्यान्तर्गत कारवाई करण्यात आली आहे. रघुनाथ फड व इतर ७ ते ८ जणांनी १८ ऑक्टोबर २०२३ रोजी सहदेव वाल्मीक सातभाई यांना अडवून मारहाण सव्वादोन लाख रुपये लुटले होते. याप्रकरणी रघुनाथ रामराव फडसह जगन्नाथ विक्रम फड, सुदीप रावसाहेब सोनवणे, बालाजी अंकुश दहिफळे (सर्व रा. परळी) व विलास बालाजी गिते (रा. नंदागौळ, ता. परळी) यांना अटक करण्यात आली आहे.
धनराज ऊर्फ राजेभाऊ फड व ग्यानदेव ऊर्फ गोट्या गिते हे दोघे पसार आहेत. या टोळीने परळी व अंबाजोगाई परिसरात दहशत माजवली असून, दोन्ही हद्दीत १० गुन्हे केल्याचे उघडकीस आले. यातील ९ गुन्ह्यांची दखल न्यायालयाने घेतली. या टोळीवर मकोका लावण्याचा प्रस्ताव ४ मे रोजी विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांच्याकडे पाठवला होता. त्यानुसार मकोका लावण्यास परवानगी दिल्याचे बीडच्या पोलीस विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे. यापूर्वी वाल्मीक कराड व त्याच्या टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई केली आहे. खोक्या ऊर्फ सतीश भोसलेवरही मकोकाची कारवाई केली आहे. अन्य एका टोळीवरही मकोका लावण्यात आला आहे.
या शिवाय बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारल्यापासून नवनीत काॅवत यांनी मागील पाच महिन्यांत ११ पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली होती. यामध्ये खोक्याला कारागृहाच्या आवारात विशेष सेवा-सवलत दिल्याचा ठपका ठेवत विनोद सुरवसे व कैलास खटाणे या पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. मात्र, नुकतेच या दोन कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेतले. तर पोलीस निरीक्षक सुनील नागरगोजे व उपनिरीक्षक रणजित कासले यांना छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांनी बडतर्फ केली आहे. दोन शिपायांना पोलीस अधीक्षकांनी बडतर्फ केले.