परभणी : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडून उभ्या असलेल्या माजी मंत्री सुरेश वरपूडकर यांच्या कुटुंबीयांपैकी केवळ एक जण विजयी तर चार जण पराभूत झाले आहेत. भाजपचे उमेदवार असलेले वरपूडकर यांचे चिरंजीव समशेर व सुनबाई प्रेरणा यांनाही जिल्हा परिषद निवडणुकीत दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. वरपुडकरांची घराणेशाही मतदारांनी जिल्हा परिषद निवडणुकीत नाकारल्याचे स्पष्ट झाले.

काँग्रेस पक्षात दीर्घकाळ घालून अलीकडेच भारतीय जनता पक्षात दाखल झालेले माजी मंत्री सुरेश वरपूडकर यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपल्याच घरातील तब्बल पाच जणांना वेगवेगळ्या पक्षातून उमेदवारी दिली होती. मुलगा समशेर वरपूडकर याला शिंगणापूर गटातून, तर सून प्रेरणा या दैठणा गटातून भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवत होत्या. याशिवाय मुलगी सोनल देशमुख यांचीही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून झरी गटातून उमेदवारी होती.

पुतण्या अजित वरपूडकर काँग्रेसकडून लोहगाव गटातून उमेदवार होते तर याच गटातून ऐश्वर्य विजयराव वरपुडकर हे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार होते. वरपुडकरांच्या कुटुंबातलेच पाच उमेदवार वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडून उभे होते. या प्रकाराची बरीच चर्चा झाली होती. वरपूडकर यांचा मुलगा समशेर वरपूडकर, सून प्रेरणा वरपूडकर, पुतण्या ऐश्वर्य वरपूडकर तर मुलगी सोनल देशमुख या चौघांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. केवळ लोहगाव गटातून काँग्रेस पक्षाकडून उभे असलेला पुतण्या अजित वरपूडकर यांचा मात्र विजय झाला आहे.

भाजपमध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय दिला जातो असा युक्तिवाद भाजपच्या वतीने नेहमीच केला जातो पण काँग्रेसमधून दाखल झालेले नेते भाजपमध्ये पुन्हा तीच घराणेशाहीची परंपरा रुजवत असल्याची टीका वरपूडकरांच्या घराणेशाहीवर सर्व स्तरातून झाली होती.परभणी तालुक्यातील पोखर्णी नृसिंह गटातून भाजपचे विलास बाबर हे इच्छुक होते.बाबर हे पक्षाचे जिल्हा सरचिटणीस तसेच भाजपच्या किसान मोर्चाचे राज्यस्तरावरचे पदाधिकारी असताना या गटातून त्यांची उमेदवारी कापण्यात आली. वरपूडकर यांच्याशी आपण सातत्याने संघर्ष केला आहे. त्यांच्यामुळेच आपली उमेदवारी रद्द झाली असा आरोप बाबर यांनी केला होता. वरपूडकर यांच्या मुलगा व सुनेसह कुटुंबातील चार जणांचा पराभव झाल्याने मतदारांनी त्यांना नाकारल्याचे स्पष्ट झाले आहे.