परभणी जिल्ह्यात आज सोमवारी पावसाची संततधार सुरूच असून सलग तिसऱ्या दिवशीही सूर्यदर्शन झालेच नाही. या पावसाने जिल्ह्यातील लघु व मध्यम सिंचन प्रकल्प भरले असले तरी नदी व ओढ्याकाठच्या शिवारात पाणीच पाणी साचल्याने कापूस सोयाबीन या पिकांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेकडो एकर शिवारातील ही पिके गेल्या तीन दिवसांपासून पाण्यात असल्याने मोठा फटका बसण्याची भीती निर्माण झाली आहे.

हे ही वाचा… Maharashtra News Live : “औरंगजेब फॅन क्लबचे चेअरमन देवेंद्र फडणवीस”, खासदार संजय राऊतांचा हल्लाबोल

पुराच्या पाण्यात परिवहन महामंडळाची बस वाहून गेल्याची घटना मानवत तालुक्यातील वझुर (बु.) या गावी पहाटे चारच्या सुमारास घडली. वझुर गावी पाथरी आगाराची ही बस मुक्कामी होती. चालक सुदाम दहे आणि वाहक शिवाजी देशमुख हे दोघे बसमध्ये झोपलेले होते. पहाटे बसमध्ये पाणी शिरल्याचा आवाज येत असल्याचे लक्षात आल्यावर दोघांनी बस चालू करण्याचा प्रयत्न केला. परंतु बस चालू होण्यास वेळ लागला. तो पर्यंत एक मोठा पाण्याचा लोंढा आला आणि बस जागा सोडून वाहू लागली. प्रसंगावधान राखून चालक व वाहक यांनी बसमधून उड्या मारल्या व जीव वाचवला. बस शंभर मीटर पेक्षा अधिक दूर पाण्यात वाहून गेली. एका खांबाजवळ जावून ही बस अडकल्याची माहिती आहे.