मध्ययुगीन काळातील सामाजिक, धार्मिक व राजकीय स्थितीवर प्रकाश टाकणारे मोडी कागदपत्रांचे प्रदर्शन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील इतिहास वस्तुसंग्रहालयात सुरू झाले आहे. प्रदर्शन पाहण्यासाठी दोन दिवस इतिहास अभ्यासकांनी गर्दी केली.
राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. बी. एस. वाघमारे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. विभागप्रमुख डॉ. उमेश बगाडे, डॉ. पुष्पा गायकवाड, डॉ. बीना सेंगर, अभिलेखाकार डॉ. कुमार भवर, सुधीर बलखंडे व लिप्यंतरकार मिच्छद्र चौधरी, प्रबुध्द मस्के या वेळी उपस्थित होते. प्रदर्शनात पेशवे दप्तर, होळकर दप्तर, मराठा दप्तर, सातारा दप्तर आणि इंग्रज दप्तरातील पत्रे आहेत. १७७८ ते १८३० या काळातील कागदपत्रांतून तत्कालीन सामाजिक, राजकीय व धार्मिक स्थिती लक्षात येते. सातारा दप्तरातील कागदपत्रे न्यायनिवाडय़ाशी संबंधित आहेत. शिवाय दरोडेखोरांचा बंदोबस्त करण्याबाबतची इंग्रज अधिकाऱ्यांना संस्थानिकांनी लिहिलेली पत्रे प्रदर्शनात आहेत. पठणचे बापूजी नाईक भाकरे यांच्यासह हरी भक्ती, आबाजी नाईक वानवल, अप्पाजी शंकर भिडे हे सावकार पेशव्यांना कर्ज देत असत. या कर्जाबाबतची काही पत्रे प्रदर्शनात मांडली आहेत. या प्रदर्शनाला अभ्यासकांनी भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. देवनागरीत अनुवाद मोडी ही मध्ययुगात कार्यालयीन कामकाजाची महत्त्वपूर्ण भाषा होती. इतिहास विभागात अनेक महत्त्वाची पत्रे असून भाषांतराचे काम सुरू आहे. या प्रदर्शनासाठी लिप्यंतरकार मोरे यांनी काही कागदपत्रे देवनागरी लिपीत अनुवादित करून मूळ मोडी कागदाजवळ ठेवली आहेत. पत्र पाहिल्यानंतर अर्थ समजण्यास त्याचा उपयोग होत आहे.
प्रदर्शन १९ जानेवारीपर्यंत खुले आहे. इतिहासप्रेमींनी प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ. उमेश बगाडे यांनी केले. मेणवली दफ्तर, पटवर्धन दफ्तर, निजाम-मराठे, नागपूरकर भोसले, करवीर संस्थानची कागदपत्रे, सातारा दफ्तर, अहिल्याबाई होळकर, पेशवे दफ्तर व इंग्रजांची काही कागदपत्रे इत्यादी महत्त्वपूर्ण ऐतिहासिक कागदपत्रांचा ठेवा. आपल्या संग्रही आहे. या प्रदर्शनात सामाजिक, सांस्कृतिक, आíथक, राजकीय, धार्मिक विषयांशी संबंधित मोडी कागदपत्रे व त्या कागदपत्रांचा मराठी तर्जूमा देण्यात आला.