पैठणजवळ जायकवाडी धरण परिसरातील संत ज्ञानेश्वर उद्यानात दिवंगत नेते शंकरराव चव्हाण यांचा पुतळा उभारण्याचा निर्णय झाला होता. काँग्रेस राजवटीत उभारलेल्या या पुतळ्याचे अनावरण करण्याचा मान मात्र फडणवीस राजवटीला मिळाला आहे. येत्या १६ ऑक्टोबरला मान्यवरांच्या उपस्थितीत पुतळा अनावरण होणार आहे.
माजी मुख्यमंत्री, तसेच केंद्रात दीर्घकाळ मंत्री राहिलेल्या शंकरराव चव्हाण यांच्या निधनाला ११ वर्षे लोटली. त्यांच्या प्रयत्नांतून साकारलेल्या जायकवाडी धरण परिसरात त्यांचा पुतळा उभारण्याचा निर्णय तत्कालीन आघाडी सरकारने घेतला. गतवर्षी झालेल्या सत्तांतरापर्यंत विलासराव देशमुख व अशोक चव्हाण या मराठवाडय़ातील, तसेच पृथ्वीराज चव्हाण या काँग्रेस नेत्यांनी मुख्यमंत्रिपद भूषविले; पण शंकररावांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा मुहूर्त काँग्रेस राजवटीला काही साधता आला नाही.
इकडे, नांदेडला शारदा भवन एज्युकेशन सोसायटीच्या परिसरातही शंकररावांचा पुतळा उभारून कापडी आवरणाखाली झाकून ठेवला आहे. त्यालगत शंकरराव चव्हाण स्मृती संग्रहालयाची वास्तूही उभी राहिली. हे दोन्ही प्रकल्प लोकार्पणाच्या प्रतीक्षेत असताना, राज्याच्या जलसंपदा विभागाने जायकवाडीजवळील ज्ञानेश्वर उद्यानातील चव्हाण यांच्या पुतळ्याचे अनावरण निश्चित करून, कार्यक्रमाची तयारी सुरू केली आहे.
येथे मिळालेल्या माहितीनुसार येत्या १६ ऑक्टोबरला दुपारी ३ वाजता होणाऱ्या कार्यक्रमात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण होणार असून विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत. औरंगाबादचे पालकमंत्री रामदास कदम, माजी मुख्यमंत्री व नांदेडचे खासदार अशोक चव्हाण, खासदार चंद्रकांत खैरे, आमदार सतीश चव्हाण व विक्रम काळे यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असल्याचे सांगण्यात आले.
जायकवाडी धरणाचे भूमिपूजन १८ ऑक्टोबर १९६५ रोजी तत्कालीन पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांच्या हस्ते झाले. त्या प्रसंगाला ५० वर्षे पूर्ण होत असताना या धरणाचे नायक म्हणून ज्यांचा उल्लेख होतो त्या शंकररावांच्या पुतळ्याच्या अनावरणाचे औचित्य मात्र भाजप सरकारने साधल्याबद्दल पक्षाचे जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर यांनी आनंद व्यक्त केला.