छत्रपती संभाजीनगर :  इराण – अमेरिका युद्धामुळे तांब्याच्या दरात मोठी वाढ झाल्याने इंदू मिल येथे उभा करायच्या ४५० फुटांच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे काम संथ गतीने सुरू आहे. या कामासाठी राज्य सरकारने १०८९ कोटी ९५ लाख रुपयांची तरतूद केली होती. यापैकी ७४७ कोटी ७१ लाख रुपयांचा निधीही स्मारकासाठी उभारण्यात आलेल्या प्राधिकरणास देण्यात आला आहे. मात्र, तांब्याचे जुने दर आणि  झालेली दरवाढ यामुळे कामाची गती मंदावली आहे. यासाठी दरातील फरक व लागणारा वाढीव निधी मिळावा यासाठी मुख्यमंत्र्यांनी बैठक घ्यावी अशी मागणी समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

 संजय शिरसाट यांनी लिहिलेल्या पत्रात पुतळ्याच्या कामास ‘ अपरिहार्य ’ कारणास्तव गती मिळत नाही असे म्हटले आहे. प्रत्यक्षात हे काम सध्या बंदच आहेच. इंदू मिल येथील परिसरात डॉ.  बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारक बनविण्याच्या प्रकल्पास गती देण्यासाठी २०२२ मध्ये सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीकडून प्रकल्पाचा वेळोवेळी आढावा घेण्यात आलेला आहे. पुतळ्याच्या ब्रॉन्झ आवरणाचे काम सुतार फाईन आर्ट यांच्या नोएडा येथील कार्यशाळेत  प्रगतीपथावर असून पुतळ्याच्या दोन्ही पायाच्या बुटांचे कास्टिंग पूर्ण करण्यात आले आहे. मात्र, या कामात काही अडथळे निर्माण झाले असून मुख्यमंत्र्यांनी आढावा बैठक घेतली तर कामास गती येईल, असे पत्र समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट यांनी पाठवले आहे.

 या अनुषंगाने संजय शिरसाट यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, गेल्या काही दिवसांत युद्धामुळे तांब्याचा दर प्रतिकिलो ८५० रुपयांहून १७५० रुपयांपर्यंत वाढला. दुपटीहून अधिक दर वाढल्याने निविदाधारकाने दरातील फरक मिळावा, अशी विनंती केली आहे. अचानक उद्भवलेल्या स्थितीमुळे निविदाधारकांची मागणी अयोग्य नाही. यामुळे अर्थविभाग आणि मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नी लक्ष घालावे अशी विनंती केली आहे. मुख्यमंत्र्यांनीही लवकर बैठक घेऊ असे कळवले आहे. ’   डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिल येथे भव्य ग्रंथालय,  वस्तूसंग्रहालय उभारण्याचा संकल्प करण्यात आला होता. मुंबईत होणाऱ्या या स्मारकामुळे पर्यटकही वाढतील, असा सरकारचा दावा आहे. सध्या तांब्याच्या किमती वाढल्याने पुतळ्याचे काम थांबले असल्याच्या वृत्तास शिरसाट यांनी दुजोरा दिला.