परभणी : परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत अनुकंपा तत्वावरील भरती तसेच रोजंदारीवरील कर्मचार्यांच्या नियुक्त्या, सरळसेवा भरतीसह कर्ज वाटपातील गैरव्यवहाराच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी पुणे येथील सहकारी आयुक्त कार्यालयातील अप्पर निबंधकांची नियुक्ती करण्यात येत असल्याची माहिती राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार राजेश विटेकर यांनी विधानसभेत मांडलेल्या एका लक्षवेधीद्वारे जिल्हा बँकेंतर्गत गेल्या तीन-चार वर्षांपासूनच्या चालू असलेल्या गैरकारभारावर जोरदार टीका केली. यावेळी विटेकर यांनी गंभीर स्वरुपाचे आरोप केले. विशेषतः बँकेंतर्गत अनुकंपा तत्वावर भरती करतेवेळी भ्रष्ट साखळीने जवळपास ५० ते ६० कर्मचार्यांचे वारसदार नसणाऱ्यांना सेवेत सामावून घेतले.
त्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सकांद्वारे घेतलेले खोटे प्रमाणपत्रे आधार म्हणून वापरण्यात आले, याकडे विटेकर यांनी लक्ष वेधले. मोठ्या प्रमाणावर कर्मचार्यांना नियुक्त करताना त्यातील काही रोजंदारी कर्मचार्यांना सेवेतही सामावून घेतले असा गंभीर आक्षेप विटेकर यांनी घेतला. बँकेत सर्व नियमबाह्य कामे करताना भ्रष्ट साखळीने सर्व नियम, अटी, गुंडाळून ठेवल्या. सरळ सेवा भरती प्रक्रियेतसुध्दा १५२ जागांसाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार होतो आहे,
यातून सरळ सेवा भरती करणार्या कंपनीस अडचणीत आणण्याचा प्रकार होतो आहे, हेही विटेकर यांनी स्पष्ट केले. कर्ज वाटपामध्ये बँकेने केवळ मर्जीतील संचालकांना त्यांच्या हितसंबंधी व्यक्तींना मोठ्या प्रमाणावर कर्ज वाटप केले. कर्ज वाटपात कमिशन घेण्याचे प्रकार यावेळेस बँकेतल्या भ्रष्ट साखळीने केल्याचा आरोप विटेकर यांनी केला.
या प्रश्नास उत्तर देताना सहकारमंत्री पाटील यांनी अनुकंपा तत्वावर भरतीत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाले आहेत याची आपणास माहिती मिळाली असून त्या सर्व नियुक्त्या रद्द केल्या जातील, तसेच चौकशीत दिरंगाई करणार्या अधिकार्यांविरुध्दही कारवाई केली जाईल, सरळ सेवा भरती करणार्या कंपनीकडे दहा हजारांवर अर्ज प्राप्त झाले आहेत. भरतीची प्रक्रिया प्राथमिक स्तरावर आहे, त्यामुळे थेट कंपनीवर आरोप करणे पूर्णतः चुकीचे आहे, असे नमूद करीत सहकार मंत्री पाटील यांनी अप्पर निबंधकांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीद्वारे या प्रकरणात कसून चौकशी करू तसेच समितीची कार्यकक्षाही निश्चित करू, असे आश्वासन दिले.
