औरंगाबादमधील उद्योगाला दुबईचा पुरस्कार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

औरंगाबाद : ग्रामीण भागातील ८०० महिला आणि सुमारे १२ हजार शेतकऱ्यांच्या आयुष्यात सौर वाळवण यंत्राच्या साहाय्याने मोठे आर्थिक बदल घडवून आणणाऱ्या ‘एस फॉर एस’ म्हणजे सायन्स फॉर सोल्युशन या लघुउद्योग कंपनीला संयुक्त अरब अमिरातीचे पंतप्रधान शेख मोहम्मद बीन राशिद यांच्या वतीने दिला जाणारा ‘झायेद सस्टेनॅब्लिटी’ हा पुरस्कार मिळाला आहे.

जगभरातील ८६ संस्थांना हा पुरस्कार देण्यात आला असून त्यात औरंगाबाद येथे अन्न प्रक्रिया उद्योगात प्रामुख्याने काम करणाऱ्या लघु उद्योग कंपनीची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. सहा लाख अमेरिकी डॉलर असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सौर ऊर्जेवर वाळवण यंत्र तयार करणाऱ्या युवकांनी या क्षेत्रात केलेल्या कामाची आता आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. ‘लोकसत्ता’मध्ये ‘बंदा रुपया’ या सदरात या कंपनीच्या कार्यशैलीचा आढावा मांडण्यात आला होता.

आरोग्याच्या क्षेत्रातील पारितोषिक अर्जेंटिना, ऊर्जा क्षेत्रातील पुरस्कार बांगलादेश तर अन्न प्रक्रिया क्षेत्रातील पुरस्कारासाठी एस फॉर एस या लघुउद्योग कंपनीची निवड करण्यात आली. भारतात विविध ठिकाणी काम करणाऱ्या एस फॉर एस या लघु उद्योग कंपनीकडून औरंगाबाद व फुलंब्री तालुक्यात अन्न प्रक्रिया क्षेत्रातील काम उभे करण्यात आले आहे. सौर वाळवण यंत्र ( सोलार ड्रायर यंत्र) विकसित करून त्याचे प्रयोग ग्रामीण भागात करण्यात आले.

या कंपनीचे अश्विन पावडे म्हणाले, ग्रामीण भागातील महिलांमध्ये पोषणमूल्य वाढविण्याचे काम करतानाच त्यांना उद्योजक बनविण्याचे काम समोर आहे. हा पुरस्कार मिळविताना केलेल्या कामाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली, त्याचा आनंद आहे.

रोजगार निर्मितीत योगदान… 

या कंपनीमुळे ग्रामीण भागात रोजगारही वाढला असून विशेषत: महिलांच्या हाताला काम मिळाले आहे. या कंपनीच्या उत्पादनामुळे २२ हजार टन कृषी उत्पादने वाया जाण्यापासून वाचतात, असा दावा कंपनीकडून केला जात आहे.

कंपनी काय करते?

गाजर, भेंडी, कांदा, लसूण तसेच अन्य कृषी उत्पादनांचे छोटे काप करून या यंत्राव्दारे वाळविले जातात. या यंत्रामुळे अन्नातील पोषक द्रव्ये जशास तशी राहतात. त्यामुळे वाळवलेले पदार्थ तयार करणे, त्याचे श्रेणीनिहाय वर्गीकरण करणे आदी कामे औरंगाबादसह राज्यात तसेच अन्यत्रही अनेक ठिकाणी केले जातात.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: International attention of the company which is recovering the rural economic cycle akp
First published on: 21-01-2022 at 00:22 IST