गारपिटीनंतर मराठवाडय़ात आंतरराष्ट्रीय हवामान संशोधन केंद्राची मागणी

औरंगाबाद : गेल्या दहा वर्षांत पाच दुष्काळी वर्षे आणि सात वेळाहून अधिकदा झालेल्या गारपिटीमुळे मराठवाडय़ातील कृषीचे प्रश्न पुन्हा ऐरणीवर आले असून दोन दिवसापूर्वी झालेल्या गारपिटीमुळे गुरुवारी मराठवाडा गारठला. असा गारवा पुढील तीन दिवस असेल व त्याचा कडाकाही वाढत जाईल असे हवामान तज्ज्ञ व अंतराळ संशोधन केंद्रातील तज्ज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी सांगितले. हवामान बदलाचा हा कल आता बारकाईने तपासण्याची आवश्यकता असून प्रादेशिक हवामान अभ्यास केंद्रे सुरू करण्याची मागणी केली जाऊ लागली आहे.दरम्यान मराठवाडय़ातील तापमानात मोठी घसरण झाली असून औरंगाबादचे किमान तापमान गुरुवारी १२.६ अंशापर्यंत खाली आले होते. मात्र, वाऱ्याचा वेग अधिक असल्याने बोचऱ्या थंडीने औरंगाबादकर गारठले.

हवा अधिक उंचीला जात असताना बाष्प अधिक प्रमाणात झाले तर गारपीट होण्याची शक्यता वाढते असे महात्मा गांधी अंतराळ संशोधन संस्थचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी सांगितले. पूर्वेकडून म्हणजे बंगालच्या उपसागरावरून येणारे वारे व कधी कधी अरबी समुद्रावरून येणारे वारे बरोबर बाष्प आणतात. त्यामुळे हवा अधिक उंचीवर जाते. वाऱ्याचे जेट तयार होतात आणि ९ ते १२ किलोमीटपर्यंत वारे गेल्याने गारपीट संभवते. उत्तर भारतात बर्फ पडण्याचा हा पॅटर्न आता महाराष्ट्रात दिसू लागला आहे. त्यात मराठवाडय़ाचा व पूर्व विदर्भाचा भाग अधिक आहे. गेल्या काही वर्षांपासून सूर्यावरील डाग आणि हवामान बदल याचा अभ्यास केल्यानंतर गारपीट हे या भागातील हवामानाचे नवे प्रारूप ठरू लागले आहे. अलीकडेच सी- डॉपलर यंत्रणा बसविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असला तरी प्रादेशिक हवामान केंद्र उभारण्याची गरज असल्याची मागणी होत आहे. गेल्या दहा वर्षांत १० हजार कोटीहून अधिक रक्कम मराठवाडय़ात मदतीपोटी  खर्च झाली आहे. पुढील काळात पिकांचे कमीत कमी नुकसान व्हावे यासाठी अधिक अचूक माहितीसाठी अशा केंद्राची आवश्यकता असल्याचे सांगण्यात येत आहे.