परभणी : ‘इन्व्हेस्ट इन परभणी’ या उपक्रमांतर्गत पार पडलेल्या गुंतवणूक परिषदेत १६२ उद्योजकांसोबत सुमारे १ हजार ६२२ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत. या प्रस्तावित गुंतवणुकीच्या माध्यमातून पंधरा हजाराहून अधिक स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण होणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

येथे रविवारी (दि.१६) गुंतवणूक परिषद पार पडली. यावेळी पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, खासदार रामराव वडकुते, जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण, सहाय्यक आयुक्त संजय भुरेवाल, अमोल बळे, उद्योजक निलेश त्रिभुवन, धीरेन गिलानी, बिपीन इंगोले, सुषमा मोरधानिया, बाळासाहेब गिते, संतोष एकलारे यांच्यासह उद्योजक उपस्थित होते.

जिल्ह्यातील उपलब्ध साधनसंपत्ती, अकुशल मनुष्यबळाला प्रशिक्षण देऊन स्थानिक पातळीवरच कौशल्य विकसित करण्यात येईल आणि उद्योगांसाठी असलेल्या संधींचा उपयोग करून अधिकाधिक गुंतवणूक आकर्षित करण्यात येईल तसेच येत्या दसऱ्यापर्यंत या उद्योगांच्या इमारत बांधकामाची पायाभरणी करण्यात येईल. तसेच या गुंतवणुकीतून स्थानिक उद्योजकांना चालना मिळेल, असे प्रतिपादन पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केले.

शासनाच्या विविध योजनांचा लाभ स्थानिक उद्योजकांना मिळवून देण्यासाठी प्रशासनामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांच्या माध्यमातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणली जात असून, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत सुमारे ८० हजार नोंदणी झाल्या आहेत. गुंतवणुकीसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, वित्तपुरवठा, अनुदान व पात्रता याबाबत उद्योजकांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. विविध सामंजस्य करारांची प्रक्रिया एकखिडकी पद्धतीने सुलभ करण्यावर भर देण्यात येत आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही परभणी गुंतवणूक परिषदेला शुभेच्छा दिल्या.

जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी कृषी हे परभणीचे प्रमुख सामर्थ्य आहे, शेतातून कंपनी ते कंपनी ते जागतिक बाजारपेठेत उत्पादन उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट असावे असे आवाहन केले. उद्योजक निलेश त्रिभुवन, सुषमा मोरधानिया, मराठवाडा दलित इंडस्ट्री चेंबर्स अँड कॉमर्सचे अध्यक्ष मिलिंद कांबळे यांचीही भाषणे झाली. उद्योजक सुनील घैसासी यांनी ई-कॉमर्स क्षेत्रात भविष्यात सुमारे ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा मानस व्यक्त केला. तर धीरेन गिलानी यांनी अन्नप्रक्रिया क्षेत्रात आगामी पाच वर्षांत सुमारे १ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची माहिती दिली. या माध्यमातून सुमारे १० हजार स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.

मेसर्स पालवी ॲग्री कंपनीचे नितीन इंगोले यांनी ई-कॉमर्स क्षेत्रात ७५ कोटी रुपयांची गुंतवणूक करून व्यवसाय सुरू करण्याची माहिती दिली. परिषदेमुळे परभणी जिल्ह्यातील औद्योगिक क्षमता, कृषीआधारित उद्योग, फूड प्रोसेसिंग, ई-कॉमर्स आणि रोजगारनिर्मितीच्या संधींना व्यापक व्यासपीठ मिळाले असल्याची भावना उपस्थित उद्योजकांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील मोडक, श्रीकांत मानोलीकर यांनी केले तर आभार अनुप शुक्ला यांनी मानले.