औरंगाबाद :  गुंतवणूक प्रोत्साहन परिषदेमध्ये  निमंत्रित सदस्य नेमण्याच्या शासन  निणर्यातील  रामचंद्र भोगले यांच्या नावासमोर संभाजीनगर या उल्लेखावरून एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आक्षेप घेतला

आहे. सरकारमध्ये हिंमत असेल तर त्यांनी नाव बदलाचा सरळ निर्णय घ्यावा पण पडद्याआडून अशा खेळ्या महापालिका निवडणुकांसाठी खेळल्या जात असल्याचे ते म्हणाले. अशा प्रकारे शासन  निर्णय काढून त्यावर स्वाक्षरी करणाऱ्या अधिकाऱ्यासही निलंबित करण्याची मागणी खासदार जलील यांनी केली आहे.

 औरंगाबाद शहराचे नामांतर हा विषय गेल्या वर्षभरपासून तापविला जात आहे. अलिकडेच संभाजीनगर असे औरंगाबाद शहराचे नामकरण करण्याची हीच योग्य वेळ असल्याचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी म्हटले होते. उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागाच्या वतीने काढण्यात आलेल्या २२ ऑक्टोबरच्या आदेशात निमंत्रित सदस्यांच्या नावासमोरीत पत्त्यामध्ये संभाजीनगर- औरंगाबाद असा उल्लेख करण्यात आलेला आहे. रामचंद्र भोगले हे अप्लाइड इनोव्हेशन अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजीस ग्रुपचे अध्यक्ष असून गंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी  नेमण्यात आलेल्या समितीमध्ये ते  पाच पैकी एक सदस्य आहेत. या समितीमध्ये  मुंबईचे नितीन पोतदार,  मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सचे महासंचालक प्रशांत गिरबने,  प्रसन्न सरंबळे व सुरेश राठी यांची नावे आहेत. पण औरंगाबादमधील सदस्याच्या नावासमोर संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आला आहे.

शासन  निर्णयात करण्यात आलेल्या या उल्लेखावरून आता राजकारण तापत असून खासदार जलील यांनी अशा प्रकारच्या शासन आदेशावर आक्षेप घेत निषेध नोंदविला आहे.

कोणतीही निवडणूक आली की असे धंदे सुरू होतात. आता लोक पाणी द्या म्हणतील तेव्हा हे नाव बदलणार. हिंमत असेल तर त्यांनी नाव बदलावे. खरेतर असे करणाऱ्या कक्ष अधिकाऱ्याला मुख्यमंत्र्यांनी निलंबित करायला हवे. पण हे सारे निवडणुकीपूर्वी असेच वागणार. – इम्तियाज जलील, खासदार औरंगाबाद