छत्रपती संभाजीनगर – देवाच्या साक्षीने पाठीत लोखंडी गळ टोचून नवस फेडण्याची अघोरी परंपरा छत्रपती संभाजीनगर शहराजवळ काही शतकापासून सुरू आहे. ही परंपरा अघोरी असून विज्ञानाच्या चौकटीत बसत नाही. त्यामुळे यात्रेतील गळ टोचणीची अघोरी प्रथा बंद करावी अशी मागणी आता पुढे आली असून, या प्रथेवर बंदी असल्याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे.
यापूर्वी ही प्रथा बंद करावी असा निर्णय देण्यात आला आहे. पण या निर्णयाची अंमलबजावणी कोणी व कशा पद्धतीने करावी, याचे निश्चित धोरण ठरवण्यात आले नसल्याने वरील अघोरी प्रथा सुरू आहे.
आता कॉ. गणपत भिसे यांनी लाल सेना संघटनेच्या वतीने जनहित याचिका दाखल केलेली आहे. या संदर्भात २७ मार्च रोजी याचिकाकर्त्यांच्या वतीने खंडपीठात शपथपत्र दाखल करण्यात आले आहे. यापूर्वी या प्रकरणातील याचिकेवर २०१९ साली तत्कालीन खंडपीठाचे तत्कालीन न्या. नितीन सांबरे व न्या. प्रसन्ना वराळे यांच्या न्यायपीठासमोर सुनावणी झाली होती. त्यावेळी अघोरी प्रथा कायद्याने बंद करण्यात आल्याचा निवाडा दिला होता.
परंतु ही अंमलबजावणी करण्यासाठी यंत्रणा कोण असेल किंवा कशी असावी या संदर्भात निर्णय झालेला नव्हता. त्यामुळे आता विद्यमान न्या. विभा कंकणवाडी व न्या. हितेश वेणेगावकर यांच्या न्यायपीठाने याचिकाकर्ते गणपत भिसे यांना शपथपत्र दाखल करण्याची सुचना केली होती. न्यायालयाचे असे म्हणणे होते की, याचिकाकर्त्यांनी देखील गळबंदीच्या उपक्रमात सहभागी होणे अपेक्षित होते.
केवळ शासन प्रशासनावर जबाबदारी ढकलून चालणार नाही. त्यामुळे याचिकाकर्त्यांनी यापूर्वी गळबंदीसाठी काय-काय प्रयत्न केलेले आहेत, या संदर्भात कोर्टाकडे माहिती सादर करावी, तपशील सादर करावा असे आदेशित केल्यावरुन अॅड. कानडे यांनी शुक्रवारी खंडपीठासमोर मागील दहा-बारा वर्षांपासून लालसेनेच्या वतीने गळबंदी करण्यासंदर्भात केलेली जाणीव जागृती, शासन प्रशासनाकडे केलेला पाठपुरावा आदी संदर्भात पुरावे कागदपत्रे सादर केले. न्यायालयाने हे सर्व पुरावे दाखल करून घेतले असून यासंदर्भात १८ एप्रिल रोजी यावर सुनावणी ठेवली आहे.
दरम्यान येत्या ७ एप्रिल पासून शेंद्रा येथे मांगिरबाबांचा यात्रा महोत्सव सुरू होत आहे या महोत्सवात सहभागी होणाऱ्या भाविकांनी स्वतःच्या शरीराला इजा होईल असे कुठलेही प्रयत्न करू नयेत आणि ज्या न्यायालयाने गळटोचणीस कायद्याने बंदी घातली आहे त्या न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करावे असे आवाहन याचिकाकर्त्यांचे वकील अॅड. अंगद कानडे व याचिकाकर्ते कॉम्रेड गणपत भिसे यांच्या वतीने जनतेला करण्यात येत आहे.
