छत्रपती संभाजीनगर : इराण आणि इस्रायल युद्ध सुरू झाल्यापासून म्हणजे २८ फेब्रुवारी ते आजपर्यंत लोखंडी सळ्यांच्या दरात प्रतिक्विंटल सहा हजार रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या १२ दिवसांत प्रतिटन ५६ हजार रुपये असणारा दर आता ६१ हजार ५०० रुपयांवर गेला आहे. आखाती देशासह विविध ठिकाणातून आयात होणारे स्क्रॅप पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याने अशी परिस्थिती उद्भवली असल्याचे जालना येथील स्टील उद्योजक डी. बी. सोनी यांनी सांगितले.
कोणत्या प्रकारच्या सळ्या बनवायच्या आहेत, यावर त्याचे लोखंड अवलंबून असते. काही कंपन्या रशियातून ‘स्क्रॅप’ माल मागवतात. त्याच्या पुरवठ्यावर परिणाम झाले असल्याचे सांगण्यात आले. या वृत्तास राजस्व विभागातील एका अधिकाऱ्यानेही दुजाेरा दिला. जालना शहरात १९ स्टील उद्योग आहेत. त्यांना सहाय्यकारी ३५ ते ४० कंपन्या आहेत.
जालना शहरातून प्रतिवर्षी ३.५ ते चार दशलक्ष टन सळ्यांचे उत्पादन केले जाते. गेल्या काही दिवसात मिळणारा कच्चा माल पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याने सळ्यांचे भाव अपरिहार्यपणे वाढवावे लागत असल्याचे सांगण्यात येत आहे. स्टील उद्योगातील या महागाईचा फटका घरबांधणीवर होण्याची शक्यता आहे. कोविडनंतर कमी कालावधीमध्ये अलीकडच्या काळातील ही सर्वांत मोठी वाढ असल्याचे सांगण्यात येत आहे. सळई उद्योगावर युद्धाचा फटका आणि त्याच्या भीतीमुळे दर वाढत असल्याचे सांगण्यात येत आहे.
