नांदेड : जिल्ह्याच्या राजकारणात विविध पक्षांच्या नेत्यांमधील व्यक्तिगत संबंधांत अलीकडे दुरावा वाढत चाललेला असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेेते, कंधारचे माजी आमदार ईश्वरराव भोसीकर यांच्या सहस्रचंद्र दर्शन सोहळ्याच्या निमित्ताने सर्वच राजकीय पक्षांचे नेते रविवारी एका मंचावर आले. याप्रसंगी गौरवमूर्तींनी वयाचे शतक साजरे करावे, अशी सदिच्छा व्यक्त झाली. तसेच त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला.

वयाच्या पन्नाशीपूर्वीच विधान परिषद आणि विधानसभा या दोन्ही सभागृहांमध्ये प्रतिनिधित्व करणारे भोसीकर ९२व्या वर्षातही प्रकृतीने ठणठणीत असून त्यांच्या नागरी गौरव सोहळ्यापूर्वी ईश्वरराव व सरस्वतीबाई भोसीकर यांच्या सहस्रचंद्र दर्शन सोहळ्याप्रीत्यर्थ कौटुंबिक पातळीवरील कार्यक्रम त्यांचे पुत्र राजेंद्र, संजय व डॉ.नीळकंठ भोसीकर यांनी यथोचितपणे पार पाडले.

कंधार तालुक्यातील पानभोसी येथे रविवारी दुपारी झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पंढरपूर संस्थानचे गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी भूषविले. राज्याचे माजी मुख्यमंत्री खा.अशोक चव्हाण, त्यांचे राजकीय विरोधक आ.प्रताप पाटील चिखलीकर, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील, माजी राज्यमंत्री डॉ.माधव किन्हाळकर व डी.पी.सावंत, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खा.रवींद्र चव्हाण, खा.डॉ.शिवाजी काळगे यांच्यासह माजी आमदार अमरनाथ राजूरकर, हणमंतराव बेटमोगरेकर आदी प्रमुख नेते मंचावर उपस्थित होते. याप्रसंगी ‘ईश्वरायण’ या गौरवग्रंथाचे प्रकाशन वरील नेत्यांच्या हस्ते करण्यात आले.

बाबासाहेब पाटील, खा.अशोक चव्हाण यांना अन्य कार्यक्रमांसाठी लवकर जायचे असल्यामुळे सुरुवातीच्या सत्रात त्यांची भाषणे झाली. या दोघांनीही भोसीकर यांच्या राजकीय कारकिर्दीचा गौरव केला. काँग्रेस पक्षात राहून त्यांनी सर्वच पक्षातल्या नेत्यांशी सलोख्याचे संबंध राखले, असे खा.चव्हाण यांनी नमूद केले. ईश्वररावांनी नव्वदी पार केली, तरी त्यांच्याकडे पाहून त्यांच्या वयाचा अंदाज येत नाही. त्यांची प्रकृती पाहता ते शंभरी निश्चितच पार करतील, असा विश्वास सर्वच वक्त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी संजय भोसीकर यांनी प्रास्ताविक केले. भोसीकर परिवारातील सुलोचनाताई देशमुख, मंगलाताई पाटील, राजेंद्र भोसीकर, संजय व नीळकंठ भोसीकर आदींनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. ईश्वरायण या ग्रंथाचे प्रकाशन झाल्यानंतर या ग्रंथाचे संपादक संजीव कुळकर्णी यांनी प्रस्तुत ग्रंथासंबंधी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विक्रम कदम यांनी केले. कार्यक्रमादरम्यान छायाचित्रकार विजय होकर्णे निर्मित ‘ईश्वर-सरस्वती ः जनसेवेचा सहस्रचंद्र’ हा माहितीपट उपस्थितांना दाखविण्यात आला.

ईश्वरराव भोसीकर काँग्रेस पक्षाशी कायम एकनिष्ठ राहिले. त्यांच्यासारखा निष्ठावंत नेता माझ्या मतदारसंघात आहे, याचा मला अभिमान वाटतो. मी वेळोवेळी पक्ष बदलले असले, तरी कोणाला घाबरून कधीच पक्ष बदलला नाही. मी कुठल्याही पक्षात गेलो, तरी भोसीकरांचा माझ्यावर कायम आशीर्वाद राहिला.-आ.प्रताप पाटील चिखलीकर