छत्रपती संभाजीनगर : इस्रायल – इराण युद्धामुळे औद्योगिक वसाहतीमध्ये वापरले जाणारे ‘एलपीजी’चे ‘ सुमो ’ सिलेंडर मिळणे बंद झाले आहेत. ४२५ लिटरच्या या सुमो सिलेंडरच्या उर्जेतून विविध वाहन कंपन्यामध्ये ‘ पावडर कोटींग ’ केले जाते. आता ही प्रक्रियाच महाग होईल. त्याचे परिणाम उद्योगावर होऊ शकतात, असे औद्योगिक संघटनांकडून सांगण्यात येत आहे.
केंद्र सरकारने घरगुती गॅस पुरवठ्यात अडचणी येऊ देऊ नका, अशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे गॅस पुरवठा विस्कळीत होईल अशी भीती व्यक्त होऊ लागली आहे. उद्योगांना गॅस पुरवठा करणाऱ्या पुरवठादारांनी आता हा व्यवहार रोखीत करण्यास प्राधान्य दिले आहे. तसेच गॅस वापर असणाऱ्या सवलतीही कमी केल्या आहेत. परिणामी उद्योगांच्या अर्थकारणास मोठा फटका बसू शकतो असे सांगण्यात येत आहे.
शुक्रवारी उद्योगाला होणारा गॅस पुरवठा सुरळीत होता असे विविध कंपन्यांसाठी गॅस पुरवठ्याचे समन्वयक नितीन बजाज यांनी सांगितले. पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनीही पुरवठ्यात कोणतीही अडचण नसल्याचा दावा केला.पावडर कोटींग आणि पेंटींग या दोन्ही प्रक्रिया वाहन उत्पादन क्षेत्रात वापरल्या जातात.
छत्रपती संभाजीनगरमधून दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहन उद्योगाची मोठी उलाढाल आहे. त्या उद्योगाला लागणारा गॅसचा पुरवठा आता विस्कळीत झाला आहे. काही कंपन्यांना ‘सुमो ’ सिलेंडर मिळणार नाही, असे सांगण्यात आले आहे. तसे ई -मेल संदेशही पाठविण्यात आले आहेत.
सध्या गॅस पुरवठ्यावर असणारा उर्जास्रोत वीज वापराकडे वळविण्यासाठी किमान दोन महिने लागू शकतात.
ती प्रक्रिया तातडीने होणार नाही. ताेपर्यंत वाहन उत्पादनावर मोठा परिणाम होऊ शकतो असे चेंबर ऑफ मराठवाडा ॲग्रीकल्चर आणि इंडस्ट्रीजचे मानद सचिव मिहिर सौंदलगीकर म्हणाले. या अनुषंगाने जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना विचारले असता ते म्हणाले, ‘अद्याप अशा प्रकारची कोणतीही माहिती जिल्हा प्रशासनास नाही. मात्र, औद्योगिक संघटनांनी अशी अडचण असल्याचे कळविल्यास त्यात प्रशासन लक्ष घालेल.’
सीएमआयए या औद्योगिक संघटनेचे पदाधिकारी अजिंक्य काळे म्हणाले, ‘ वाळुज आणि शेंद्रा या दोन्ही औद्योगिक वसाहतीमध्ये पावडर कोटींग आणि गॅसची उर्जा वापरणारे अनेक उद्योग आहेत. त्यांना सुमो सिलेंडर लागतो. ४२५ लिटरच्या या सिलेंडरची किंमत साधारणत: २८ हजार रुपये असते. अगदी एका कंपनीमध्ये दिवसाला ८०० लिटर्सपर्यंत त्याचा उपयाेग होतो.
आता ते सिलेंडर मिळणार नाहीत किंवा त्यासाठी अगाऊ रक्कम भरा असे कळविण्यात आले आहे. ही परिस्थिती किती दिवस राहील, हे माहीत नसल्याने संभ्रम आहेत. अखाती देशातील निर्यात बंद असल्याने त्याचा परिणाम काही दिवसात जाणवेल. पण गॅस पुरवठा ही मोठी डोकदुखी ठरू शकते. ’
