छत्रपती संभाजीनगर : ‘ निग्रो साहित्य ’ साहित्याचा अभ्यास करुन त्याची साम्यस्थळे दलित साहित्यामध्ये दाखविणारे, विषमता निर्मूलन शिबिरांमध्ये बाबा आढाव आणि नरेंद्र दाभोलकर यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे माजी खासदार आणि शिक्षण क्षेत्रात योगदान देणारे जे. एम वाघमारे यांचे सोमवारी सकाळी ९.३० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि लातूरचे नगराध्यक्ष म्हणून त्यांची कारकीर्द महत्त्वपूर्ण मानली जाते. औसा तालुक्यातील कवठा या गावी त्यांच्यावर उद्या ११ वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत.

मराठवाड्यातील शिक्षण क्षेत्रात महत्वपूर्ण बदल करण्यात जे. एम वाघमारे यांचा मोलाचा वाटा होता. शाहू महाविद्यालयाच्या स्थापनेपासून लातूरच्या शिक्षण प्रारुपास आकार देणारे व्यक्तिमत्त्व अशी त्यांची ओळख. त्यांनी लातूरचे नगराध्यक्षही भूषविले आणि २००८ ते २०१४ या कालावधीमध्ये राज्यसभेत खासदार म्हणूनही काम केले. नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे पहिले कुलगुरू असणाऱ्या वाघमारे यांचा अभ्यासाचा विषय इंग्रजी साहित्य हा होता. निग्रो साहित्य तसेच दलित-पुरोगामी साहित्य चळवळीबाबत त्यांनी भरीव लेखन व चिंतन केले. ते १९५७ चे पदवीधारक. हैदराबादमधील निजाम महाविद्यालयातून इंग्रजीचे शिक्षण घेतल्यानंतर इंग्रजी साहित्यात युद्धानंतर निग्रो जीवनातील संदर्भ त्यांनी अभ्यासले. त्यांची पीएच.डी या विषयामध्ये होती.

शिक्षण, समाजकारण आणि राजकारण या तिन्ही क्षेत्रांत त्यांनी केलेले भरीव कार्य समाजासाठी दिशादर्शक ठरले, अशी प्रतिक्रिया लातूरमधून व्यक्त होत आहे. मानव संसाधन, कृषी विषयातील संसदीय स्थायी समितीमध्ये त्यांनी काम केले होते. राज्य नियोजन मंडळातही ते सदस्य होते. शिक्षण आणि समाज जीवनातील बारकावे माहीत असणारे विचारवंतांचे निधन झाल्याने लातूकरांमधून हळहळ व्यक्त होत आहे.