छत्रपती संभाजीनगर : साखरेचे उत्पादन शुल्क विचारात घेता साखरेला किमान ४१ रुपये दर मिळायला हवा अशी साखर कारखांनदारांची मागणी सध्या गुळ बाजारपेठेत पूर्ण होताना दिसते आहे. या वर्षी गुऱ्हाळे तशी कमी झाल्याने गुळाचा दर चार हजार ते ४ हजार ८०० रुपये क्विंटल एवढा राहिला. तर साखरेचा ठोक भाव सरासरी ३७ रुपयेच राहिला. परिणाम या वर्षी साखरसाठ्यावर मिळणारे कर्ज ३२५ रुपयांनी कमी मिळाल्याने अडचणी वाढल्या होत्या. मात्र, गुळाचा भाव तेजीत होता.

गुळ पावडर करणाऱ्या कारखान्यांची संख्या मात्र दिवसेंदिवस वाढते आहे. उसा हमीभाव दिला तरी गुळपावडर कारखानेही तोट्यात असल्याची ओरड आहे. मात्र, गुळ पावडरची अधिकाधिक विक्री उत्तर प्रदेश , बिहार, तामिळनाडू या राज्यात हाेते. साधारणत: मद्य निर्मितीमध्येही गुळ पावडर वापरली जाते. तीव्र गोडी आवश्यक असणाऱ्या काही पदार्थामध्येही गुळ पावडरचा उपयोग होतो. पण गेल्या १५ वर्षात गुळ विक्री घसरलीच असल्याचे व्यापारी सांगातात. या वर्षी गुळाचा वार्षिक दर साखरेपेक्षा अधिक राहिला.

राज्यातील सर्वाेत्तम बाजारपेठ असणाऱ्या लातूरचे व्यापारी अशोक अग्रवाल म्हणाले, ‘ गेल्या दहा वर्षात गुळ बजारपेठ घसरणीला लागली. गुळाच्या ढेपीचा आकार बदलला. घरगुती वापरासाठी गुळ वापर घटला आहे. आता गुळ पावडरचे कारखाने सुरू झाले. गेल्या दहा वर्षात गुळ आवक घटली. ती साधारणत: २ हजार डाग गुळ येतो. पूर्वी हजारो टन गुळ येत आहे. लातूरहून विदर्भातही गुळ जात असे. आता हे प्रमाण घसरले आहे.’

साखरेचा वापर आणि त्याचे दर यावर विविध प्रकारचे निर्बंध आहेत. मात्र, गुळ किती लागतो, तो कशात वापरला जातो, याची माहितीच उपलब्ध नाही. गुळ खाण्याचे प्रमाण मात्र दिवसेदिवस घटते आहे. जेवढी गुळपावडर बनते त्याचेही खाण्याचे प्रमाण कमी आहे. बहुतांश गुळ कोठे वापरला जातो, याची माहिती शासकीय दप्तरी माहीत नाही. मात्र, गुळाचा दर या वर्षी साखरेपेक्षा अधिक राहिला.

तीव्र गोडीच्या पदार्थामध्ये विशेषत: चॉकलेट, बिस्कीट आदीमध्ये साखर आणि गुळ वापरला जातो. मात्र, बहुतांश गुळ मद्य निर्मितीमध्ये वापरला जातो. त्याचे दर या वर्षी ४८ रुपयांपर्यंत वधारलेले होते. किरकोळ बाजारात तर तो ७० ते ८० रुपये किलोपर्यंत गुळ विक्री होतो. गुळ पावडर उत्पादक मात्र पावडरचा दर २ हजार ७०० ते ३ हजार २०० रुपयांपर्यंत राहिल्याने या वर्षी हे कारखानेही अडचणीमध्येच असल्याचे सांगतात.