छत्रपती संभाजीनगर – येथील रहिवासी जगमित्र रामलिंग लिंगाडेने १० नोव्हेंबर रोजी लुधियानात उस्ताद झाकीर हुसेन स्मृतीनिमित्त घेण्यात आलेल्या तबला वादन स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे एक लाखाचे बक्षीस प्राप्त केले. पंजाबमधील लुधियाना शहरात सतगुरु जगजीत सिंह शास्त्रीय संगीत प्रतियोगिता स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये देशभरातून प्रारंभी १४१ तबला वादकांनी नोंदणी करून आपल्या वादनाच्या चित्रफिती पाठवल्या. त्यातून ४१ स्पर्धकांची निवड झाली. ४१ मधून ३६ युवा कलावंतांमध्ये स्पर्धा रंगली.

अंतिम चरणातील स्पर्धेत जगमित्र रामलिंग लिंगाडे याने प्रथम क्रमांक प्राप्त करत लाखाचे बक्षीस प्राप्त केले. त्याला पं. तळवलकर, पं. योगेश शामसी, उस्ताद हरचंद्रपाल आदींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. जगमित्र पुण्यामध्ये पद्मश्री पुरस्कार प्राप्त पं. सुरेश तळवलकर यांच्याकडे गुरुकुल पद्धतीने तबला वादनाचे शिक्षण घेतो आहे. जगमित्रचे वडील मूळचे परळी वैजनाथ येथील रहिवासी आहेत.

मागील दोन ते अडीच दशकांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये स्थायिक असून, ते येथे संगीत शिकवणी वर्ग चालवतात. संगीत शिक्षक म्हणूनही सेवा देतात. जगमित्रची बहीण आसावरी पुण्यात भव्य रांगोळी रेखाटण्याचे शिक्षण घेत असून, नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सवात स्वारगेटजवळील गणपती मंडळासमोर १५ बाय १२ फुटाच्या अंतरात दगडूशेट हलवाईच्या गणपती रांगोळीतून साकारला होता.

जगमित्रने दहावीचे शिक्षण घेतल्यानंतर पुढे तबला वादन क्षेत्रात पूर्णवेळ उतरण्याचा निर्णय घेतला असून सध्या तो पद्मश्री पुरस्कार प्राप्त पं. सुरेश तळवलकर यांच्या गुरुकुलात मागील पाच-सहा वर्षांपासून तबला वादनाचे शिक्षण घेत आहे. लुधियानातील एक लाखांचा पुरस्कार मिळाल्यानंतर जगमित्र याची २३ नोव्हेंबर रोजी नवी दिल्लीत स्वतंत्र मैफल आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती त्याचे वडील रामलिंग लिंगाडे यांनी दिली.