छत्रपती संभाजीनगर : जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दुचाकी वाहनांसाठी २०० रुपये आणि तीन चाकी व चारचाकी वाहनांसाठी जास्तीजास्त दोन हजार रुपयांचे इंधन देण्यात यावे असे निर्देश जालना जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी काढले आहेत. त्यामुळे पेट्रोल पंपावर मोठ्या रांगा दिसून आल्या. काही पेट्राेल पंपावर इंधन संपल्याचे फलक लागल्याने टंचाईत भर पडली आहे. या पुढे कोणत्या प्रकारच्या कॅन, बाटल्या, तसेच ड्रममध्ये इंधन देण्यात येऊ नये असे कळविण्यात आले आहे.
दरम्यान याच प्रकारचा आदेश छत्रपती संभाजीनगर शहरासाठीही लागू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पेट्रोल आणि डिझेलचा साठा पुरेसा असला तरीही त्याची टंचाई जाणवेल या भीतीमुळे पेट्राेलपंपावर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रत्येक दूचाकीसाठी फक्त २०० रुपयांपर्यंतचे पेट्राेल देण्याबाबतचा निर्णय घेण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी या संदर्भातील आदेश बजावले आहेत.
दररोज लागणाऱ्या इंधनाचा पुरवठा सुरळीत सुरू आहे. मात्र, लोक अचानक रांगा लावून अधिक पेट्रोल भरुन घेत आहेत. दुसरीकडे पेट्रोल पंप चालकांना इंधन खरेदीसाठी अग्रीम रक्कम देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दुपारी तीन वाजेपर्यंत रक्कम खात्यातून भरली तरच इंधन पुरवठा होईल असे सांगण्यात आले. पेट्रोल व डिझेल असोसिएशनचे अध्यक्ष अखिल अब्बास म्हणाले, परिस्थिती एवढी वाईट नाही. पण नाहक गर्दी केल्याने अडचणीत वाढ होत आहे. काही जणांनी अग्रीम रक्कम न भरल्याने त्यांच्याकडच्या साठा संपला. त्यामुळे लोक अधिक घाबरले आहेत. ही स्थिती लवकरच बदलेल.’
दरम्यान इंधन साठा पुरवठ्याचे नियम जिल्हा पातळीवर बदलण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कोल्हापूर, सोलापूरप्रमाणे छत्रपती संभाजीनगरमध्येही नवे नियम लागू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जालना जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी आदेशाची अंमलबजावणी तातडीने करावी असे नमूद केले आहे. मात्र, जीवनावश्यक सेवा, रुग्णवाहिका यांना पुरेशा प्रमाणात इंधन द्यावे अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
पुरेसे इंधन असतानाही नाहक रांगा लावल्या जात आहेत. गरज नसताना अधिकचे पेट्रोल भरुन घेतले जात असल्याने टंचाईसदृष्य स्थिती निर्माण होत आहे. दररोज पुरेसा साठा येत आहे. मात्र, परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये म्हणून ही काळजी घेण्यात आल्याचे अधिकारी सांगत आहेत.
