मुंबई: जालना महापालिकेतील सात नगरसेवकांनी स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवेळी भाजपला मदत केल्याने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई केली आहे. फरुक सादिक तुंडीवाले, इम्रान खान आमानुल्ला खान, फरहाना अ. रऊफ अंसारी, सुनिल अशोक बोरडे, मयुरी दिनेश देने, रुबिना मजिद पठाण, अनिल अशोक तिरुखे अशी या नगरसेवकांची नावे असून पुढील आदेशापर्यंत त्यांना या शिस्तंभंगाच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

अंबरनाथमध्ये १२ नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिल्याने त्यांच्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना कारवाई करणे भाग पडले होते. त्यापाठोपाठ आता जालन्यातील सात नगरसेवकांनीही भाजपलाच पाठिंबा दिल्याने त्यांचे निलंबन करण्याची वेळ पक्षावर आली. जालना महापालिकेत स्वीकृत सदस्य निवडीवेळी भारतीय जनता पक्षाला उघडपणे मदत करून पक्षशिस्तीचा भंग केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. ठेवत, काँग्रेस पक्षाने आपल्या सात नगरसेवकांना तडकाफडकी निलंबित केले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

जाणीवपूर्वक पक्षशिस्त मोडली

जालना महानगरपालिकेत स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेदरम्यान काँग्रेसच्या सात नगरसेवकांनी पक्षाच्या धोरणांविरुद्ध जाऊन भाजपच्या उमेदवारांना मदत केल्याचे समोर आले होते. या गंभीर प्रकरणाची पक्षांतर्गत चौकशी करण्यात आली असता चौकशी अहवालात या सदस्यांनी जाणीवपूर्वक पक्षशिस्तीचा भंग केल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. या कारवाईचे पत्र प्रदेश उपाध्यक्ष गणेश पाटील यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध करण्यात आले. तसेच याची प्रत जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांना माहितीसाठी पाठवण्यात आली.