औरंगाबाद : राज्यात शिवसेनेतील बंडाळीच्या पार्श्वभूमीवर जालना सहकारी साखर कारखान्याची खरेदी-विक्री व्यवहारातील २०० एकरपेक्षा अधिक जागा व यंत्रसामग्री सक्त वसुली संचालनालयाने जप्त केली आहे. सावरगाव हडप येथील जालना कारखान्याचा राज्य सहकारी बँकेने बेकायदेशीर लिलाव केल्याप्रकरणात जालन्याचे शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांचीही चौकशी झाली होती. अंतरिम जप्तीमध्ये केलेल्या कारवाईतील कारखान्याच्या मालमत्तेची किंमत ७८.३८ कोटी रुपये एवढी आहे. 

राज्य सहकारी बँकेकडील कर्ज परत केल्यामुळे जालना कारखान्याच्या लिलाव बेकायदेशीर असल्याची तक्रार करण्यात आली होती. उच्च न्यायालयच्या निर्देशानुसार मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखने दाखल केलेल्या २२ ऑगस्ट २०१९ मध्ये गुन्ह्याचा तपास सध्या सक्त वसुली संचालनालयाकडून करण्यात येत आहे. संचालकांनी त्यांच्या नातेवाइकांना हा कारखाना कमी किमतीत विकला जावा यासाठी प्रयत्न केले होते. सरफेसी कायद्याचे उल्लंघन करून झालेल्या हा बेकायदेशीर असल्याबद्दल सक्त वसुली संचालनालयाने अर्जुन खोतकर यांचीही चौकशी केली होती. राज्य शिखर बँकेचे या कारखान्याकडे ३३ कोटी ४९ लाख रुपयांचे कर्ज थकीत होते. ही रक्कम वसूल करण्यासाठी ४२ कोटी १८ लाख रुपये अशी रक्कम ठरविण्यात आली होती. या लिलावात तापडिया कस्ट्रक्शन व अजित सिडस यांनी सहभाग नोंदविला होता. तापडिया यांनी ४२ कोटी ३१ लाख रुपये तर अजित सिडस् कडून भरण्यात आलेली किंमत अपेक्षित किमतीपेक्षा कमी होती. या दोन्ही निविदाधारकांचे एकाच इमारतीमधून व्यवसाय सुरू होते. नंतर हा कारखाना न चालविता तो १५ महिन्यांनी अर्जुन इंडस्ट्रीजला विक्री करण्यात आली. सक्त वसुली संचालनालयाने केलेल्या तपासणीमध्ये तापडिया कन्स्ट्रक्शनने केवळ १०.५६ कोटी रुपये भरले तर उर्वरित रक्कम ही अर्जुन इंडस्ट्रीज कडून घेतलेली होती. दुसऱ्याचा लाभ व्हावा म्हणून तापडिया कंपनीचा पुढाकार आणि अर्जुन खोतकर यांच्यासाठी हा व्यवहार झाल्याचा आरोप होता. या कारखान्यातील बॉयलरची विक्रीही अर्जुन इंडस्ट्रीजने नंतर केल्याचे तपासात दिसून आले. त्यानंतर कारखान्याची जमीन व इतर मालमत्ता विक्री करण्यास उपविभागीय अधिकारी व  जिल्हाधिकाऱ्यांनी मज्जाव केला होता. साखर कारखान्याकडील एकूण जमिनीपैकी १०० एकर जमीन सरकारची असल्याने या प्रकरणी आता संपत्ती जप्त करण्याची करण्याची कारवाई सक्त वसुली संचालनालयाने केली आहे. एका बाजूला राज्यातील राजकीय घडामोडी होत असताना सुरू करण्यात आलेल्या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या जात आहेत.

न्यायालयाचा मार्ग मोकळा – खोतकर

जालना सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता ईडीने जप्त केली तर त्याविरुद्ध संवैधानिक मार्गाने न्यायालयात दाद मागण्याचा मार्ग मोकळा आहे. आपण मुंबई ते नाशिकदरम्यान प्रवासात असताना आपणास ही माहिती मिळाली. त्याबद्दलचा अधिक तपशील प्रवासात असल्याने मिळालेला नाही, असे शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी शुक्रवारी सायंकाळी ‘लोकसत्ता’स सांगितले. ईडीने केलेल्या या कारवाईबद्दल शुक्रवारी सायंकाळपर्यंत आपल्या कार्यालयाकडे कोणतीही अधिकृत माहिती पोहोचली नव्हती, असे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी सांगितले. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी कारखान्याच्या विक्री संदर्भात तक्रारी केल्या असून मूल्यांकनात गैरप्रकार झाल्याचा आरोप केलेला आहे. गेल्या १ डिसेंबर रोजी सोमय्या यांनी जालना दौरा करून हा कारखाना गैरप्रकारे विक्री झाल्याचे सांगून अर्जुन शुगर इंडस्ट्रीजवर आरोप केले होते. त्या वेळी अर्जुन खोतकर यांनी राजकीय उद्देशाने आपल्यावर बेछूट आरोप करण्यात येत असल्याचे सांगितले होते.