छत्रपती संभाजीनगर : कमी पावसात येणाऱ्या काही नव्या पीक रचनेमुळे जालना जिल्ह्यात नवे बदल होऊ लागले आहेत. जिल्ह्यातील ७७८ ग्रामपंचायतींअंतर्गत येणाऱ्या ९७० गावांमध्ये प्रत्येक गावाने किमान २० एकर क्षेत्रावर तुती, अलसी, शतावरी आणि रेशीम शेती यांसारखे प्रयोग हाती घेण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी अमिषा मित्तल यांनी या प्रयोगासाठी पुढाकार घेतला आहे.
कमी उत्पन्न देणाऱ्या आणि हवामानावर अवलंबून असलेल्या पारंपरिक पिकांऐवजी हवामानातील अनिश्चिततेला तोंड देणारी पर्यायी पिके घेण्यास शेतकऱ्यांना प्रवृत्त करण्यात आले. प्रत्येक गावात केवळ २० एकर क्षेत्रावरही ही पिके घेण्याचे ठरविण्यात आले. कधी अतिवृष्टी कधी ढगफुटीमुळे तर बहुतांश वेळी दुष्काळ यामुळे शेतकरी मेटाकुटीला आल्याने छोटे पण नगदी रक्कम हाती येईल अशी पिके घेण्याचे ठरविण्यात आले. गेल्या काही वर्षापासून सोयाबीन पीक घेतले जाते. मात्र, कमी कालावधीमध्ये अधिक पैसे देणारी पिके शोधण्यात आली. त्यातून आता लक्षणीय उत्पन्न मिळू लागले असल्याचा दावा केला जात आहे. आतापर्यंत जालना जिल्ह्यात ९५० एकर क्षेत्र पर्यायी पिके हाती घेण्यात आली. डिसेंबर २०२५ ते यावर्षी मार्च या कालावधीत जालना जिल्ह्यात चिया बियाण्याची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली.
चार महिन्यांच्या सोयाबीन पिकातून शेतकऱ्यांना प्रति एकर अवघा सुमारे १० हजार रुपयांचा नफा मिळतो. त्याच कालावधीत चिया बियाणे, रेशीम शेती, अलसी आणि शतावरी यांसारख्या पिकांमधून अनुकूल परिस्थितीत प्रति एकर सुमारे एक लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळण्याची क्षमता आहे. वाढत्या हवामान बदलावर अशी पिके अधिक लाभकारक असल्याचा अधिकाऱ्यांचा दावा आहे.
बदनापूर तालुक्यातील कुंभारी गावातील अल्पभूधारक शेतकरी मनोज एकहांडे यांनी चिया बियाणांची लागवड करण्यासाठी प्रति एकर केवळ पाच हजार रुपयांची गुंतवणूक केली आणि प्रति एकर सरासरी पाच क्विंटल उत्पादन घेतले. त्यांनी १० क्विंटल उत्पादन वाशीम बाजारात २० हजार रुपये प्रति क्विंटल दराने विकले. उर्वरित उत्पादन घाऊक विकण्याऐवजी त्यांनी स्वतः पॅकिंग करून प्रतिकिलो ५०० रुपयांनी थेट विक्री सुरू केली. परिणामी हाती चांगले पैसे आल्याचे ते म्हणाले. असाच बदल मंठा तालुक्यातील पिंपरखेडा गावातही झाला आहे. चार एकर शेती असलेले शेतकरी प्रभाकर खराबे यांनी औषधी पीक असलेल्या पांढऱ्या मुसळीची लागवड सुरू केली आहे. या पिकासाठी प्रति एकर सुमारे १.४० लाख रुपयांची गुंतवणूक लागते. मात्र पाच महिन्यांत तीन क्विंटलपेक्षा अधिक उत्पादन मिळू शकते आणि बाजारात त्याचा दर प्रति क्विंटल १.५० लाख रुपयांपर्यंत पोहोचतो. जालना जिल्ह्यातील रेशीम शेतीचे प्रयोग अधिक रक्कम मिळवून देणारे असल्याचे चित्र आहे. नव्या प्रयोगामुळे हवामान मात करणारी शेती विकसित करण्यावर भर दिला जात आहे.
