जालना – जालना शहर शुक्रवारी रात्री ८.३० च्या गोळीबाराच्या घटनेने हादरून गेले. जालना शहरातील नूतन वसाहत भागातील घाटी रुग्णालय परिसरात एका तरुणावर दुचाकीवरून आलेल्या तीन जणांनी अंधाधुंद गोळीबार केला. या घटनेमध्ये गंभीर जखमी तरुणाला तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु रात्री १०.३० च्या सुमारास उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. चरण रायमल (वय २८, रा. घाटी परिसर, जालना शहर) असे मृत तरुणाचे नाव आहे.

तरुणावर गोळीबार झाल्याच्या घटनेची माहिती मिळताच जालन्याचे पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, उपअधीक्षक व कदीम जालना ठाण्याच्या प्रमुखांसह अन्य दोन मिळून तीन पोलीस निरीक्षक, पोलिसांचा अन्य ताफा नूतन कॉलनी वसाहतीत दाखल झाला. या घटनेच्या संबंधाने पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांनी सांगितले की, कदीम जालना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नूतन वसाहत भागातील घाटी रोड परिसरात शुक्रवारी रात्री सव्वा आठ ते साडे आठच्या सुमारास एका दुचाकीवरून आलेल्या दोन ते तीन तरुणांनी चरण रायमलु या तरुणावर गोळीबार केला. या घटनेमध्ये चरण रायमलू हा गंभीर जखमी झाला.

रुग्णालयात दाखल करताना त्याची प्रकृती चिंताजनक होती. त्याला एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आरोपी पकडल्याशिवाय या घटनेचा उलगडा होणार नाही. त्यामुळे प्रत्यक्ष आरोपींना पकडल्यानंतरच नेमकी घटना कुठल्या कारणावरून घडली, नेमकं काय घडले आहे, याची माहिती मिळू शकेल असे पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.

दरम्यान पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्याच्या दृष्टीने काही पथके तयार केल्याची माहिती आहे. चरण रायमलू याचा रात्री १०.३० नंतर उपचारा दरम्यान मृत्यू झाला. चरणवर चालवलेल्या तीन गोळ्यांपैकी एक गोळी चरण रायमलूच्या डोक्यात लागली होती. गोळीबार करून हत्या केल्याच्या घटनेने जालना शहर पूरते हादरले आहे.