जालना – दुकानदाराकडून साठ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याच्या आरोपावरून जालना येथील वस्तू व सेवा कर कार्यालयातील अधिकारी आणि खासगी कर सल्लागाराच्या विरुद्ध लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. सुवर्णा रामेश्वर लोहिया (राज्य कर अधिकारी) आणि अक्षय प्रेमचंद जैन -लोढा (खासगी कर सल्लागार) अशी आरोपींची नावे आहेत. १७ जुलै २०२६ रोजी तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे फिर्याद दिली होती.
तक्रारदाराचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे दुकान आहे. त्यांना ६ जून २०२६ रोजी वस्तू व सेवा कर कार्यालय जालना येथील राज्य कर अधिकारी सुवर्णा रामेश्वर लोहिया यांच्याकडून त्यांचे ‘इनपुट टॅक्स क्रेडिट ब्लॉक ‘ केल्याबाबत कारणे दाखवा नोटीस मिळाली होती. त्यानुसार तक्रारदारांनी १७ जुलै २०२६ रोजी त्यांचे कर सल्लागार अक्षय लोढा यांची कार्यालयात भेट घेतली असता त्यांनी तक्रारदारास सांगितले की, आपले काम करण्यासाठी राज्य कर अधिकारी सुवर्णा लोहिया यांनी एक लाख रुपये लाचेची मागणी केली असून त्यांना भेटा. परंतु लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे वरील आरोप करणारी तक्रार दिली.
१७ जुलै २०२६ रोजी तक्रारदार पंचा सोबत वस्तू व सेवा कर कार्यालय जालना येथील राज्य कर अधिकारी सुवर्णा रामेश्वर लोहिया यांच्या कडे गेले .त्या वेळी त्यांनी तक्रारदारास त्यांचे काम करण्यासाठी पंचासमक्ष एक लाख रुपयांची मागणी केली. पहिला हप्ता म्हणून दहा हजार रुपये कर सल्लागार अक्षय लोढा यांना सोबत घेऊन आल्यानंतर स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानंतर दिनाक २१ जुलै २०२६ रोजी परत तक्रारदार व पंच सुवर्णा लोहिया यांच्या कार्यालयात गेले.तेंव्हा असता तेथे सुवर्णा लोहिया यांनी दहा हजार रुपये घेणार नाही असे सांगून तडजोड अंती ८० हजार रुपयांची मागणी केली.
तसेच कर सल्लागार अक्षय लोढा यांनी ‘तुम दोनोंको मिलवाया. अपना आकडा डीसाईड कर दो.जलदीसे फ्री कर दो ‘ असे तक्रारदारास पंचासमक्ष समक्ष सांगितल्याचा आरोप आहे. त्यानंतर सुवर्णा लोहिया यांनी कार्यालयातील त्यांच्या कक्षात तक्रारदाराकडून लाचेचे ६० हजार रुपये पंचा समक्ष स्वीकारून टेबलच्या ड्राॅवर मध्ये ठेवली असा आरोप आहे. दोन्ही आरोपींकडून प्रत्येकी एक मोबाईल जप्त करण्यात आला आहे.
