जालना – शहरातील चन्दनझिरा पोलिसांनी संशयावरून पकडलेल्या तीन मालवाहू वाहनांतील तीन कोटींचे मांस कशाचे आहे हे तपासण्यासाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. या प्रयोगशाळेचा तपासणीचा अहवाल आला आहे. त्यामुळे तिन्ही मालवाहू वाहन सोडले आहे. या तिन्ही मालवाहू वाह‌नांमध्ये एकूण ३ कोटी १४ लाख ९५ हजार ५०० रुपयांचे मांस होते. परभणी जिल्हयातील पूर्णा येथील कत्तलखान्यातून हे मांस मलेशियात निर्यातीसाठी नेले जात असताना जालना शहराजवळील नागेवाडी टोलनाक्याजवळ ही तीन वाहने पकडली होती.

पोलीस उपअधीक्षक अनंत कुळकर्णी यांनी यासंदर्भात सांगित‌ले की, तिन्हीही मालवाहू वाहनांतील मांसाचे नमुने तपासणीसाठी छत्रपती संभाजीनगर येथील न्यायवैद्यक प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. या नमुन्यांची तातडीने तपासणी करून अह‌वाल देण्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक अजय‌कुमार बन्सल यांनी पत्र दिले होते. १ एप्रिल रोजी पाठविण्यात आलेल्या न‌मुन्यांचा अहवाल दोन एप्रिल रोजी सायंकाळनंतर प्राप्त झाला. या अहवालानुसार हे मांस म्हशीचे असल्याने पोलिसांनी तिन्हीही मालवाहू वाहने सोडली.

कुळकर्णी यांनी सांगितले की, मांसाच्या नमुन्यांची तपासणी करण्यासाठी गुन्हा दाखल असणे आवश्यक असल्याचे न्यायवैयक प्रयोगशाळेचे म्हणणे होते. ज्या अठरा चाकी तीन मालवाहू वाहनांतून मांस नेण्यात येत होते ती तिन्ही वाहने वातानुकुलीत होती. पूर्णा येथे म्हशीच्या मांसासाठी कत्तलखाना असून तेथील सर्व काम सीसीटीव्ही खाली असते. त्याचप्रमाणे तेथे शासनाच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्तीही असते. मलेशियात निर्यातीसाठी नेण्यात येणाऱ्या या वाहनांतील नमुन्यांची तातडीने तपासणी आवश्यक होती.

दरम्यान, १ एप्रिल रोजी दुपारी संशयास्पद मांसाची वाहतूक करणारी तीन वाहने अडविल्यानंतर चंद‌नझिरा पोलिसांनी याप्रकरणी महाराष्ट्र प्राणीसंरक्षण अधिनियमानुसार शंभुप्रसाद कैलास प्रजापती, सत्यप्रकाश चन्द्रभान गुप्ता आणि वीरेन्द्र हरिवंश गुप्ता या तिघांच्या विरोधात हा दखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला होता. प्रत्येक वाहनात २७ हजार ९९६ किलो मांस होते आणि सोबतच्या ई-वे बिलप्रमाणे त्यांची किंमत १ कोटी ४ लाख ९८ हजार ५०० रुपये दर्शविलेली होती. तिन्ही वाहनांत मिळून एकूण मांस 3 कोटी १४ लाख ९५ हजार ५०० रुपयांचे होते.

तिन्ही वाहनांतील एकूण मांस ८३ हजार ९८८ किलो होते. उत्पादनाच्या नावात ‘बफेलो फ्रोझन अॅण्ड बफेलो फ्रोझन मीट’ असा उल्लेख होता. तर पोलिसांनी अडवून ठेवलेल्या तिन्ही मालनाहू वाहनांची एकूण किंमत ४ कोटी ३४ लाख ९५ हजार रुपये होती. पोलिसांनी न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडून तातडीने मांसाच्या न‌मुन्यांचा अहवाल मागवून घेत‌ला. २ एप्रिल रोजी सायंकाळनंतर मांस म्हशीचे असल्याचा अहवाल आल्यानंतर रात्री तिन्ही वाहने सोडून देण्यात आली.