अशास्त्रीय कामांबद्दल राष्ट्रीय हरित लवादाकडेही तक्रार

जलयुक्त शिवारच्या माध्यमातून मराठवाडय़ातील २० नद्या व १ हजार ६८४ ओढय़ांचे खोलीकरण- रुंदीकरण करण्यात आले. एका बाजूला नदीनाले खोल करताना डोंगरावर सलग समतल चर खोदण्याच्या कामात मराठवाडा तुलनेने मागे असल्याचे चित्र आहे. घेण्यात आलेल्या ४९३ कामांमध्ये ४ हजार १७८ हेक्टरवर सलग समतल चर घ्यायचे होते. पैकी निम्मेच काम पूर्ण झाले. केवळ २ हजार १९९ हेक्टरवर सीसीटीची कामे करण्यात आली. त्यामुळे पाऊस आल्यानंतर खोल केलेल्या नाल्यात पुन्हा गाळ येणार आहे. केलेली कामे अशास्त्रीय झाल्याने या कामाची राष्ट्रीय हरित लवादाकडेही आता तक्रार करण्यात आली आहे.

जलयुक्त शिवार योजनेचा मोठा डंका पिटला गेला. तथापि सरकारी कामांमध्ये कमालीचा संथपणा आहे. जलयुक्त शिवार योजनेतून पहिल्या टप्प्यात १ हजार ६८२ गावांमध्ये १३ प्रकारची कामे घ्यावीत, असे ठरविले होते. यात डोंगरावरील माती वाहून जाऊ नये, म्हणून सलग समतल चर घेणे आवश्यक होते. मात्र, खोलीकरण व रुंदीकरणाच्या कामात स्वयंसेवी संस्थांनी आघाडी घेतली. सरकारी कामही त्याच धर्तीवर सुरू राहिले. परिणामी पाणलोटासाठी आवश्यक अनेक कामे झालीच नाहीत. दगडाचा बांध घालून त्यास जाळीने बांधून ठेवणारा गॅबियन बंधारा कोणी हाती घेतलाच नाही. १ हजार ६८२ गावांमध्ये ३२६ गॅबियन बंधारे पूर्ण करायचे होते. आतापर्यंत केवळ ३ बंधारे बांधले गेले आहेत. लूज बोल्डर स्ट्रक्चर, अनघड मातीचे बंधारे ५० टक्के पूर्ण केल्याचे अहवाल देण्यात आले आहेत. गाळ काढणे आणि नदी-नाले रुंद करण्यावर भर होता. ही कामे करण्यास सरकारच्या १३७ जेसीबी मशीन सुरू होत्या. स्वयंसेवी संस्थांना डिझेल दिले जात होते. संथगतीने होणाऱ्या सरकारी जलयुक्तच्या कामामुळे २० मेपर्यंत १ हजार ६८२पैकी ३५५ गावांमध्ये १०० टक्के, ४८४ गावांमध्ये ८० टक्के काम पूर्ण झाले. ५० टक्के काम कसेबसे पुढे रेटले गेले. येत्या २० दिवसांत कितीही शक्ती खर्च केली, तरी कामे पूर्ण होण्याची शक्यता कमीच आहे.

अजूनही ८९३ गावांमध्ये जलयुक्तचे ५० टक्केही काम पूर्ण होऊ शकले नाही. विशेषत: औरगाबाद आणि हिंगोली या दोन जिल्हय़ांत कामाचा वेग कमालीचा मंद आहे. या जिल्हय़ांत अजून एकाही गावात कामे १०० टक्के पूर्ण  झाली नाहीत.

आकडय़ांच्या खेळात काढलेला गाळ आणि नद्यांच्या खोलीकरणाची आकडेवारी पुढे केली जाते. अर्थात, हे काम महत्त्वाचे आहेच;  पण अन्य कामांकडे दुर्लक्ष केल्याने पाऊस आला की पुन्हा गाळ येण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी पाणी मुरण्याची शक्यता कमी असतानाही खोलीकरण झाले तसेच काही ठिकाणी  झालेले खोलीकरण मातीच्या पाणी मुरण्याच्या क्षमतेला बाधा पोहोचविणारे असल्याचा तज्ज्ञांचा आक्षेप आहे. परिणामी येत्या २० दिवसांत पाऊस आला तर जलयुक्त ५० टक्के गुणांनी उत्तीर्ण होईल, असे सांगितले जाते.

अजूनही २४८ गावांमध्ये ३० टक्क्यांपेक्षा कमी काम झाले आहे. जलयुक्तच्या कामात वृक्षारोपणाकडे दुर्लक्ष झाल्यास त्याचा फारसा परिणाम जाणवणार नाही, असे तज्ज्ञ सांगत आहेत.