विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज जलआक्रोश मोर्चा  

भाजपकडून काढण्यात येणाऱ्या जलआक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरभर मोठे फलक लावण्यात आलेले आहेत.

औरंगाबाद : शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर भाजपकडून राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी दुपारी चारच्या सुमारास जलआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चासाठी परवानगी देण्यात आल्याचे पोलीस आयुक्तालयाकडून रविवारी सायंकाळी स्पष्ट करण्यात आले.

भाजपकडून काढण्यात येणाऱ्या जलआक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरभर मोठे फलक लावण्यात आलेले आहेत. फडणवीस यांचा दरारा म्हणजे त्यांनी मोर्चा काढण्याचे जाहीर करताच पाणीपट्टी ५० टक्क्यांवर करण्यात आली, अशी फलकबाजी भाजपकडून करण्यात येत आहे. तर त्याला उत्तर म्हणून शिवसेनेकडूनही ५० टक्के पाणीपट्टी कपात केल्याच्या मुद्दय़ावर मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांच्या निर्णयाचे स्वागत करणारी जाहिरातबाजी होत आहे. 

जलआक्रोश मोर्चाला पैठणगेटजवळून टिळकांच्या पुतळय़ापासून सुरुवात होईल. औरंगपुरा भागातून जिल्हा परिषदमार्गे मराठवाडा सांस्कृतिक मंडळापासून मोर्चा  महापालिकेत  धडकणार  आहे.

याच मार्गाने मोर्चाला परवानगी देण्यात आल्याची माहिती सिटी चौक पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक गिरी यांनी सांगितले. तर मोर्चादरम्यान, एक पोलीस उपायुक्त, दोन सहायक पोलीस आयुक्त, नऊ ते दहा पोलीस निरीक्षक व इतर मोठा कर्मचारी वर्ग बंदोबस्तात ठेवण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त उज्ज्वला वनकर यांनी दिली.

जलआक्रोश मोर्चाच्या अनुषंगाने भाजपकडून जालना रोड, क्रांती चौक ते पैठणगेट परिसरात भले मोठे फलक लावण्यात आले आहेत. तर शिवसेनेकडूनही औरंगाबादच्या पाणीप्रश्नावर त्यांच्या पक्षाकडून मांडलेली आग्रही भूमिका फलकांद्वारे व मोबाइल फोनवरील गटांमधून पाठवली जात आहे.

शिवसेनेने तत्कालीन खासदार चंद्रकांत खैरे यांनी औरंगाबादच्या पाणीप्रश्नावर थेट त्यावेळचे पंतप्रधान मनमोहनसिंग यांनाच साकडे घातले होते, अशी काही जुनी छायाचित्रे पाठवण्यास सुरुवात केली आहे.

 पाणीपट्टीत ५० टक्के सूट देण्याच्या निर्णयाचेही फलक शहरभर लावण्यात आलेले आहेत. तर दहा-दहा दिवस पाण्याची वाट, यांची मस्तीची भाषा-वेगळाच थाट, अशा घोषवाक्यांची भाजपने फलकबाजी केली आहे.

जोरदार तयारी

भाजपकडून जलआक्रोश मोर्चाचीही जोरदार तयारी आहे. मोर्चात किमान ५० हजार महिला व पुरुष सहभागी होतील, याचे नियोजन करण्यात आले आहे. विशेषत: महिलांची संख्या लक्षणीय दिसेल, असे नियोजन केलेले आहे. पाण्याचा प्रश्न महिलांच्या जिव्हाळय़ाचा आहे. शहरातील पाणीटंचाईने महिला त्रस्त झालेल्या आहेत. त्यामुळे महिला मोठय़ा संख्येने उपस्थित राहतील आणि भाजपकडून जेव्हा यासंदर्भात नागरिकांशी संपर्क साधला तेव्हा मोर्चासाठी प्रतिसाद मिळाला, असे भाजपच्या औरंगाबाद शहर महिला जिल्हाध्यक्ष अमृता पालोदकर यांनी सांगितले.

मराठीतील सर्व औरंगाबाद ( Aurangabad ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Janakrosh morcha today under the leadership of leader of devendra fadnavis zws

Next Story
औरंगाबादमध्ये एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी