नांदेड : दिल्ली येथे जंतर मंतरवर विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ माळाकोळी ता. लोहा येथे बुधवार (दि. २२) सकाळी १० वाजता नांदेड -लातूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी अर्धा तास वाहतूक ठप्प झाल्याने अनेक वाहन महामार्गावर ताटकळ थांबले होते.
दिल्लीच्या जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांचे आंदोलन मागील काही दिवसापासून सुरू आहे. शासनाकडे विद्यार्थ्यांच्या काही मागण्या असून या मागण्याकडे केंद्र शासन, देशाचे शिक्षण मंत्री व इतर मंत्री दुर्लक्ष करीत असल्याने विद्यार्थ्यांचे आंदोलन तीव्र होत चालले आहे. यावेळी महामार्गावरून जाणाऱ्या नागपूर, रत्नागिरी, सोलापूर, अमरावती, यवतमाळकडे जाणाऱ्या बसेस व खाजगी मालवाहू ट्रक मोठ्या प्रमाणावर थांबल्या होत्या. या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी सहभाग नोंदविला.
लाठीचार्जच्या निषेधार्थ नायगावात युवक काँग्रेसचे रास्ता रोको आंदोलन
दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनावर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ तसेच आंदोलनस्थळी विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ गेलेले लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार रवींद्र चव्हाण यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ नायगाव येथे बुधवारी (दि. २२) तालुका काँग्रेस कमिटी व युवक काँग्रेसच्या वतीने डॉ. हेडगेवार चौकात तीव्र निदर्शने व रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जाचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
