छत्रपती संभाजीनगर : साष्ट पिंपळगाव व डोमलगाव या जालना जिल्ह्यातील गावांतून करण्यात आलेल्या दोन हजार ब्रास अवैध वाळू उपसा प्रकरणी तहसीलदार अंबड यांनी वगळलेला चार कोटी ९० लाख रुपयांचा बोजा फेरफारवर पुन्हा नोंदविण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी बजावले आहेत.

अंबड तालुक्यातील तहसीलदारांनी १८ व्यक्तींना चार कोटी ९० लाख ७२ हजार २०० रुपयांचा दंड आकारण्याचे आदेश बजावले होते. यातून संजय नानासाहेब कटारे यांचे नाव दंडात्मक कारवाईतून वगळले. मंडल अधिकाऱ्याने चौकशी न करता हे नाव वगळले होते. खरे तर मूळ बोजा चढविण्याची कारवाई केली असल्याने आधीच रोष असल्याने या प्रकरणाची चौकशी दुसऱ्याकडे केली जावी, अशी विनंती मंडल अधिकाऱ्याने केली होती. याचा अर्थ नाव वगळताना वस्तुनिष्ठ पाहणी न करताच अहवाल दिला गेला, असा निष्कर्ष काढत केलेली नाव वगळण्याची कारवाई चुकीची असल्याचे उपविभागीय अधिकाऱ्यांनी आदेशात नमूद केले आहे.

या अनुषंगाने अजय बारस्कर यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्याची तक्रार केली होती. प्रकरणाची चौकशी केल्यानंतर तहसीलदारांनी जाणीवपूर्वक नाव वगळले असल्याचे नमूद करण्यात आले आहे. संशयास्पद नाव वगळण्याची ही कारवाई रद्द करावी व बोजा कायम ठेवावा असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. अंबड तहसीलदार कार्यालयातील अव्वल कारकुनावरही शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. आता १८ जणांच्या यादीमध्ये संजय कटारे हे नाव असणार आहे. संजय कटारे हे जरांगे यांच्या निकटवर्तीय आहेत. विविध आंदोलनात तसेच विमान प्रवासातही जरांगे यांच्याबरोबर कटारे असल्याचे दिसून आले होते.

आंदोलना दरम्यान वापरलेल्या शिवराळ भाषेमुळे जरांगे यांच्याविरुद्ध सरकारने आक्रमक भूमिका घेतली होती. यानंतर आता अंबड तालुक्यातील वाळू चोरी प्रकरणातील जरांगे यांच्या निकटवर्तीय कटारे यांच्या सातबाऱ्यावर चार कोटी ९० लाख रुपयांचा बोजा नोंदवला जाणार आहे.