छत्रपती संभाजीनगर : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे जसे पाठीराखे आहेत तसे आम्ही आमच्या नेत्यांचे पाठीराखे आहोत. जर जरांगे पाटील यांच्या विरोधात बाेलल्यावर त्यांच्या समर्थकांना राग येत असेल तर आम्हालाही आमच्या नेत्यांबद्दल एकेरी बोलल्यावर वाईट वाटते, असे सांगत उद्याेग मंत्री उदय सामंत व प्रसाद लाड यांनी संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये जात पडताळणीच्या संथ गतीबाबतचे दावे फेटाळले. अधिकारी प्रमाणपत्र देण्याबाबत आणि पडताळणीबाबत योग्य काम करत आहेत. त्यामुळे जरांगे यांचा कोणी तरी गैरसमज करुन देत असेल. तशी गैरसमज निर्माण करुन देणारी व्यवस्था कोणी उभी केली असल्यास ती मोडून काढावी, असे आवाहन मंत्री सामंत यांनी केले. सरकारने केलेल्या कारवाईची माहिती जरांगे यांच्यापर्यंत पोहचवली जाईल. जर ते सकारात्मक असतील तर उपोषण सोडवायला जाऊ, असे मंत्री सामंत म्हणाले.

जरांगे यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या चार रद्द प्रमाणपत्रातील व्यक्तींची उदय सामंत आणि प्रसाद लाड यांनी भेट घेतली. या चौघांना प्रमाणपत्र मिळविण्याचा न्यायालयीन मार्ग सांगितला. तसेच यातील अडचणीही समजावून सांगितल्या. त्या त्यांनाही मान्य असल्याचे सामंत व लाड यांनी सांगितले. मराठवाड्यातील जात पडताळणीमध्ये आलेल्या २०८५१ अर्जापैकी १६ हजार २३ प्रमाणपत्रे दिली आहेत.

केवळ ०.३ टक्के प्रमाणपत्रे देणे बाकी आहेत. सलाईन घेण्यापूर्वी जरांगे यांच्याशी रात्री २.४५ वाजता बोलताना अधिकारी नीट काम करत नाहीत असा उल्लेख वारंवार आला होता. परिस्थिती खरोखर वाईट का, हे तपासण्यासाठी मराठवाड्यातील पोलीस अधिकारी, जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकाऱ्यांची बैठक मंगळवारी घेण्यात आली. या बैठकीतून अधिकारी चांगलेच काम करत असल्याचे दिसून आले. ही माहिती पुन्हा एकदा जरांगे यांच्यापर्यंत पोहचवली जाईल. ‘प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही चार पाऊले नाही तर चार हजार पाऊले पुढे आलो आहोत आता जरांगे यांनीच गैरसमज दूर करून उपोषण सोडण्यासाठी प्रयत्न करावेत,’ असे आवाहन मंत्री सामंत आणि आमदार प्रसाद लाड यांनी केले.

गैरसमज निर्माण करणारी फळी

संवादाची सर्व दारे उघडी असताना आणि सर्व आकडेवारीसह आम्ही माहिती देत आहोत. पण गैरसमज निर्माण करणारी एक फळी जरांगे यांच्या भाेवती गोळा झाली का हे मनाेज जरांगे यांनी समजून घ्यावे आणि ती ‘ सिस्टीम ’ दूर करावी, असे आवाहनही सामंत यांनी केले. मात्र, असे गैरसमज निर्माण करणारे कोण, हे मात्र माहीत नाही. ते त्यांनाच विचारावे लागेल असेही सामंत यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

मंत्री परतणार, प्रसाद लाड मुक्कामी

मंत्री उदय सामंत हे आज पुन्हा मतदारसंघात जाणार असून आमदार प्रसाद लाड मात्र मुक्कामी आहेत. मात्र, शिष्टमंडळातील कोणी आंतरवलीस जाणार नसल्याचे बैठकीनंतर स्पष्ट झाले.