छत्रपती संभाजीनगर : इराकवर झालेल्या हल्ल्यानंतर आखाती देशातील विमानसेवा बंद झाल्याने जालन्याचे खासदार कल्याण काळे यांच्यासह ३३ व्यक्ती आखाती देशात अडकले आहेत. दुबईमध्ये अडकलेल्या व्यक्तींची संख्या नऊ असून सर्वजण सुरक्षित असून नातेवाईकांच्या संपर्कात असल्याचे प्रशासनास कळविण्यात आले आहे.
डॉ. कल्याण काळे त्यांच्या वर्गमित्रासह दुबई आणि आबुदाभी येथे सहलीस गेले होते. ते परतण्याच्या तयारीत असताना सर्व विमाने बंद करण्याची घोषणा झाल्याने ते आबुदाबी येथे अकडले आहेत. डॉ. काळे यांच्या समवेत त्यांचे मित्र आहेत. ते कुटुंबियांच्या संपर्कात असल्याचे त्यांचे बंधू जग्गनाथ काळे यांनी ‘ लोकसत्ता’ शी बोलताना सांगितले. याशिवाय छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यातील प्रत्येकी तिघे, हिंगोली जिल्ह्यातील एक दुबईमध्ये तर जालन्यातील तिघे आबुदाभी येथे अडकले आहेत. लातूर जिल्ह्यातील सहा, बीडमधील दोघे तर नांदेडमध्ये ११ जण मध्यपूर्व व परिसरातील देशांमध्ये अडकून पडले आहेत.
अडकलेल्या नागरिकांनी किंवा त्यांचे निकटच्या नातेवाईकांनी खालील मुद्द्यांवर आधारित प्राथमिक माहिती जिल्हा प्रशासनास त्वरित कळवावी, जेणेकरून सदरील माहिती एकत्रितरित्या कळवून माहिती कळवणे शक्य होईल असे प्रशासनाने म्हटले आहे. अशी माहिती देताना पारपत्रातील नाव , पारपत्र क्रमांक, त्याची प्रत्र, छायाचित्र, वॉटस् ॲप क्रमांक , ई- मेल, दुबईतील सध्याचे ठिकाण, हॉटेल, संपूर्ण पत्ता, जीपीएस निर्देशांक, अडकण्याचे कारण स्पष्टपणे नमूद करावे तसेच तसेच वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती, पासपोर्ट हरवणे, उड्डाण रद्द होणे, प्रादेशिक परिस्थिती हेही कळावे तसेच व्हिसाचा तपशील व त्याचा अंतिम दिनांकाचा तपशील कळवावा असे म्हटले आहे.
आपत्कालीन परिस्थितीत संबंधित देशातील भारतीय दूतावासांच्या क्रमांकांवर संपर्क साधावा. दूतावास नियमितपणे परिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक सूचना जारी करत आहेत, असे आवाहन करण्यात आले आले.
