छत्रपती संभाजीनगर – वडा-पाव ते वरण-भातासह शाही पुणेरी थाळीतील पदार्थांचा आस्वाद घेत खवय्येगिरी जपणाऱ्या पुणेकरांच्या ताटात आता रानभाजीलाही मानाचे स्थान मिळाले असून, मधुमेह, मूळव्याधीसारख्या विविध आजारांवर गुणकारी असलेल्या करटोलीचा आहारात समावेश करण्यात येत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे पुणेकरांच्या ताटातील करटोलीची भाजी ही मराठवाड्यात पिकणारी असून, येथील स्थानिक उत्पादकांना किलोमागे ठोक ३०० ते ४०० रुपयांचा दर मिळत असल्याने यंदा लागवडीच्या क्षेत्रातही वाढ झाली आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील देभेगाव येथून दर आठवडाला २० ते २५ क्विंटल करटोलीचा माल पुण्यामध्ये पाठवण्यात येतो आहे. देभेगावात यंदा सुमारे १५० एकर क्षेत्रावर करटोलीची लागवड करण्यात आली आहे. अवघ्या दोन महिन्याच्या आतच हाती येणारे हे रानभाजीचे पीक जून ते दिवाळीपर्यंतच्या सहा महिन्यात घेता येणारे आहे. या पिकातून शेतकऱ्यांना चांगली कमाई होत असल्याने क्षेत्रामध्ये वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे.
देभेगावातील उत्पादक शेतकरी राजू खंडागळे यांच्याकडे गतवर्षी २० गुंठ्यातच करटोलीची लागवड केली होती. या २९ गुंठ्यात त्यांनी २९ क्विंटल उत्पादन घेतले. यासाठी त्यांचा ५० ते ६० हजार रुपये बांबू, तार व जाळी आदी साहित्य व पांढऱ्या माशीसह मधमाशीपासून बचावासाठी करण्यात येणाऱ्या फवारणीच्या आैषधांवर खर्च झाला असला तरी यातील काही खर्च एकदाच उत्पादन निघण्यापूर्वीच्या तयारीतील आहे. मधमाशी फळाला डंख करत असल्याने तिचा बंदोबस्त करण्याची काळजी घ्यावी लागते. दर आठवड्याला करटोलीचा एक तोडा होतो. त्यातून तीन ते साडे तीन क्विंटल एका एकरमधून माल निघतो, असे शेतकरी सांगतात.
गतवर्षीच्या २० गुंठ्यावरून यंदा दीड एकरपर्यंत करटोलीचे क्षेत्र वाढवले आहे. देभेगावातील क्षेत्रही यंदा १५० एकरपर्यंत गेले आहे. पुण्यामध्ये करटोलीला ठाेक भाव किलोमागे ३०० ते ४०० रुपये मिळत असल्याने शेतकरी या रानभाजीच्या उत्पादनाकडे वळत आहेत. ही भाजी आैषधी गुणधर्माची असल्यानेही खरेदी होत आहे. – राजू खंडागळे, शेतकरी, देभेगाव.
क्षेत्र वाढल्याने बियाणे स्वस्त
करटोलीचे बियाणे गतवर्षी आपल्याला १५ हजार रुपये किलोच्या दराने विकत घ्यावे लागले होते. यंदा क्षेत्र वाढल्याने ५ ते ६ हजार रुपयांचा दर आहे. हे बियाणे उत्पादक शेतकऱ्यांकडेच उपलब्ध होऊ शकते, असेही खंडागळे यांनी सांगितले.
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून दरवर्षी भरवण्यात येणाऱ्या रानभाजी महोत्सवात करटोली ही भाजी महत्त्वाची मानली जाते. कृषी विभागाच्या माहिती पत्रकात करटोली ही मधुमेह, मूळव्याध, डोकेदुखी, मुतखडा, हत्तीपाय रोग, ताप, दमा, दाह, उचकी आदी आजारांवर गुणकारी असल्याचे नमूद आहे.
