छत्रपती संभाजीनगर : पत्नीच्या खांद्यावर जू देऊन मशागत करणाऱ्या लातूर जिल्ह्यातील शेतकरी काशिनाथ गायकवाड यांना प्रशासनाकडून बैल मिळाला. बियाणे आणि खतेही मिळाली. पण सारे असून त्यांना पेरणी काही करता आली नाही. मराठवाडा वगळून राज्यभर धो – धो बरसणारा पाऊस देवणीच्या शिवरात पडला नाही. काशिनाथ गायकवाड म्हणाले, ‘सारे आहे पण पाऊस नाही हो, पेरणीच बाकी आहे. ’ आठ एकरात बटईने शेती करणाऱ्या काशिनाथ गायकवाड यांच्या समोर आता मोठे संकट उभे टाकले आहे. मराठवाड्यात आतापर्यंत गेल्या वर्षीच्या तुलनेत १७ लाख हेक्टरावरील पेरणी कमी झाली आहे. भरुन येणारे आभाळ आणि भुरभर येणाऱ्या पावसाला शेतकरी वैतागले आहेत. विभागात ५८ टक्के क्षेत्रावरच पेरण्या झाल्या आहेत.

काशिनाथ गायकवाड यांना शेती नाही. देवणी तालुक्यातील बोंबळी बुद्रुकमधील हनुमंत पाटील यांची आठ एकर शेती ते बटईदार म्हणून कसतात. शेतीची मशागत करुन संसाराचा गाडा ओढणाऱ्या काशिनाथ गायकवाड यांच्याकडे बैलजोडी नव्हती. त्यावर उपाय म्हणून पत्नीच्या खांद्यावर जू देऊन मशागत करणे त्यांना भाग पडले होते. हे चित्र समाजमाध्यमांतून राज्यभर पोहचल्यावर, प्रशासनाने त्यांना एक बैल दिला. तो बश्या असल्याचे लक्षात आल्यानंतर दुसरा बैल मिळाला. मोठ्या आनंदाने काशिनाथराव यांनी बैलाचे नाव आता राजा ठेवले आहे. पहिला सोम्या आणि दुसरा राजा. बैलजोडी पूर्ण झाल्याचा मोठा आनंद गायकवाड यांच्या घरात सर्वांना आहे. याच काळात त्यांना पेरणीसाठी मोफत बियाणेही उपलब्ध झाले. खतेही मिळाली. या वर्षीच्या हंगामाचे मोठे संकट दूर झाले. आता सारे काही आहे आणि पावसाने दडी मारली आहे. राज्यात सर्वत्र धो – धो बरसणारा पाऊस मराठवाड्यात मात्र पुरेसा झालेला नाही. विभागातील पावसाची सरासरी केवळ १३ टक्के तुटीची असली तरी अनेक भागात पेरणी योग्यही पाऊस झाला नाही. विशेषत: लातूर, नांदेड जिल्ह्यातील काही भागात पेरणी करता आलेली नाही.

गेल्या पाच वर्षात मराठवाड्यात ४९.७२ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. या वर्षी जुलै महिन्यात ४२. ४२ लाख हेक्टर पिकांवर पेरणी झाली होती. या वर्षी मात्र २४. ५५ लाख हेक्टरावर पेरणी झाली आहे. अजूनही पेरणी योग्य पाऊस नसल्याचे क्षेत्र अधिक आहे. जूनमध्ये पावसाने अनेकदा दगा दिला आहे. मात्र, पुढे पाऊस वाढत जातो. राज्यात सर्वत्र धो – धो पाऊस बरसत असताना मराठवाडा मात्र अजूनही कोरडा आहे. सारे आहे, पाऊस तेवढा नाही, ही काशिनाथ गायकवाड यांची प्रतिक्रिया मराठवाड्यातील कोरडेपणा सांगायला पुरेशी आहे. पावसाची मध्येच एखादी सर येते, पेरणीची आशा निर्माण करते. पण पुरेसा पाऊस नसल्याने अनेक भागातील शुष्कता कायम आहे.