छत्रपती संभाजीनगर : अल्पवयीन मुलीवर तिच्याच मामेभावाने हातपाय बांधून अत्याचार केल्यानंतर केज पोलीस ठाण्यात तक्रार घेण्यासाठी आठ तासाचा विलंब आणि नंतर वैद्यकीय तपासणीसाठी नऊ तासाचा वेळकाढूपणा केला गेला. सकाळी ११ वाजता उपजिल्हारुग्णालयात आलेल्या अल्पवयीन मुलीचा तपासणी अहवाल रात्री आठ वाजता दिला गेला. यंत्रणेतील या असंवेदनशीलचा कहर समोर आल्यानंतर वैद्यकीय अधीक्षकांसह सहा डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी दाखविलेला हा असंवदनशीलपणा लक्षात घेता जिल्हा शल्य चिकित्सक सतीश सोळंके यांनी केज रुग्णालयास भेट दिली. या प्रकरणी एका महिला वैद्यकीय अधिकाऱ्यास तातडीने कार्यमुक्त केले. अन्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात आली. ३ जून रोजी कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर आरोग्य उपसंचालकांनी शिस्तभंगाच्या कारवाईची शिफारस करण्यात आली. या प्रकरणी वैद्यकीय अधीक्षक दत्तात्रय केंद्रे, भुलतज्ज्ञ डॉ. प्रणीता पाटील, डॉ. स्वाती साखरे , शिवकांता गवळी, अनिता मोराळे, वैशाली पारखे या सहा जणांना निलंबीत करण्यात आले आहे.

पोलिसांवर कारवाई का नाही ?

या प्रकरणी पोलिसांनी तक्रार घेण्यासाठी तेवढाच वेळ लावला. पोलीस यंत्रणेतील कर्मचाऱ्यांवर कारवाई होणे अपेक्षित होते. २६ मे रोजी तक्रार देण्यात गेलेल्या अल्पवयीन मुलगी व तिच्या आई – वडिलांना पोलिसांनी रात्री आठ वाजल्यापासून पहाटे ३.३० पर्यंत ताटकळत ठेवले होते. मात्र, पोलिसांवर कारवाई झाली नाही. अशी कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते तत्वशील कांबळे यांनी केली आहे. तक्रार देण्यासाठी आलेल्या या कुटुंबीयांना पोलिसांनी रात्रभर पायऱ्यावर बसवून ठेवल्याचा आराेप आहे.

हवालदिल पालक २७ तास उपाशी

२६ मे राेजी तक्रार द्यायला गेलेल्या अल्पवयीन मुलीचे पालक हवालदिल झाले होते. काय करावे हे सूचत नव्हते. पोलीस जसे म्हणतील तसे वागत होते. मात्र, यंत्रणेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्याकडून त्यांना कुठेही चांगला प्रतिसाद मिळाला नाही. अल्पवयीन पीडित मुलीचे पालक २७ तास उपाशीपोटी यंत्रणेला झालेला अत्याचार सांगत होते. पोलीस ठाण्यात आठ – नऊ तास आणि रुग्णालयातही तपासणी अहवाल देण्यात तेवढाच उशीर करण्यात आला. यंत्रणांच्या या असंवेदनशीलपणावर केवळ निलंबन ही कारवाई पुरेशी नाही, अशीही प्रतिक्रिया उमटू लागली आहे. केवळ आरोग्य कर्मचारी नाही तर पोलीस यंत्रणेतील कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी होत आहे.