छत्रपती संभाजीनगर: राज्यातील आंबा उत्पादकांना युद्धाच्या परिस्थितीमुळे निर्यातक्षम पिकवलेला माल परदेशात पाठवण्या बाबतची चिंता लागली आहे. पुढील महिन्यात केशर आंबा बाजारपेठेत दाखल होत असून, एकूणच जागतिकस्तरावर युद्धाचे ढग दाटून आलेले आहेत. भारतातून परदेशात होणाऱ्या आंबा निर्यातीत संयुक्त अरब अमिराती (यूएई) हा देश प्रमुख बाजारपेठ मानला जातो. २०२३ मध्ये भारतातून यूएईला सुमारे १९ हजार ४०० मेट्रिक टन (१.९४ कोटी किलो) आंब्यांची निर्यात करण्यात आला असून, त्याची एकूण किंमत २६.४ दशलक्ष डाॅलर म्हणजे सुमारे २२० कोटी रुपये इतकी असल्याचे केशर आंबा बागायतादर संघाचे पदाधिकारी तथा पणन मंडळाचे निवृत्त संचालक डाॅ. भगवानराव कापसे यांनी सांगितले.

डाॅ. भगवानराव कापसे यांनी कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण (अपेडा) या संस्थेच्या सहकार्याने सलग चार वर्षे समुद्रामार्गे निर्यातीच्या चाचण्या घेऊन निर्यातीचे तंत्रज्ञान विकसित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. तसेच गटशेतीच्या प्रयोगासाठीही त्यांचे नाव घेतले जाते.

आंबा निर्यातीबाबत डाॅ. कापसे यांनी सांगितले की, भारताच्या आंबा निर्यातीसाठी यूएई हे अमेरिका आणि ब्रिटनसह अग्रस्थानी असलेला प्रमुख देश आहे. निर्यातीत केसर, हापूस (अल्फोन्सो), तोतापुरी आणि लंगडा या जातींचा मोठा वाटा आहे. या आंब्यांची निर्यात प्रामुख्याने मुंबई, अहमदाबाद आणि चेन्नई या बंदरांमार्गे केली जाते. जागतिक व्यापार आकडेवारीनुसार भारतातून ताजे व प्रक्रिया केलेले आंबे उत्पादने मिळून सुमारे १५४ दशलक्ष डाॅलरची निर्यात होते, अशी एक माहिती असून त्यातील मोठा हिस्सा यूएईकडे जात असल्याची माहिती त्यांनी दिली.

गल्फ देशांमध्ये भारतीय आंब्यांची मागणी सातत्याने वाढत असून, प्रीमियम आणि सेंद्रिय आंब्यांनाही अधिक पसंती मिळत आहे. सुधारित सागरी वाहतूक व्यवस्था, तसेच ‘मँगो मॅनिया २०२५’ सारख्या उपक्रमांमुळे आगामी काळात भारताच्या आंबा निर्यातीला आणखी चालना मिळण्याची आशा असताना युद्धाच्या परिस्थितीमुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये निश्चितच अस्वस्थता आहे, असे डाॅ. कापसे यांनी सांगितले.

भारताएवढे उत्पादन कुठेही नाही

जागतिक स्तरावरील आंबा उत्पादनाची आकडेवारी पाहता भारताच्या जवळपास पोहोचवणारे उत्पादन कोणताही देश काढत नसल्याचे चित्र आहे. भारताने २००६ मध्ये ११.८३ दशलक्ष टन आंबा उत्पादन घेतलेले आहे. तर २०२० या वर्षात २५.६३ दशलक्ष टन उत्पादनापर्यंत भारताने झेप घेतलेली आहे. केशर आंब्याची ५१ टक्के निर्यात होते, असा दावाही डाॅ. कापसे यांनी केला आहे.

यूएई, ओमान, कतार कुवैत, सौदी अरेबिया व बहारीन या देशांमध्ये २०१९-२० मध्ये अनुक्रमे २ हजार ७५७, २ हजार ७४०, १ हजार ६०५, १ हजार ३०० व ६६९ मेट्रिक टन आंबा निर्यात झाल्याच्या आकडेवारीचा इतिहास सांगून डाॅ. कापसे यांनी उत्पादन घेणाऱ्यांमध्ये उत्तरप्रदेश, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, बिहार, गुजरात, तामिळनाडू, आेडिशा व महाराष्ट्र ही राज्ये अग्रेसर असल्याचे सांगितल