छत्रपती संभाजीनगर : थोडा पाऊस पडू लागला आणि गावागावातील ‘ पेर्ते ’ शोधण्याची लगबग सुरू झाली आहे. आणि दोन महिन्यापूर्वी वाढलेल्या लोखंडाचे भाव वाढले परिणामी या महिन्यापासून ट्रॅक्टरच्या दरात तीन टक्के वाढ होईल असे ट्रॅक्टर कंपन्यांनी वितरकांना कळवले आहे. केवळ ट्रॅक्टरचे नव्हे तर ‘नांगराचा फाळ आता ६० हजार रुपयांना तर पेरणी यंत्र ५० हजाराच्या पुढे गेले आहे. एकूण क्षेत्रापैकी ७० टक्के क्षेत्र आता यंत्राच्या आधारे होत असून आता शेतीचा भांडवली खर्च या वर्षी वाढला आहे.
राज्यात अनेक भागात पावसाने हजेरी लावायला सुरुवात केली आणि पेरणीची लगबग सुरू झाली. या वर्षी पेरणीपूर्वी डिझेल मिळत नसल्याने नांगरणीचा खर्चही वाढला होता. इस्राएल आणि इराण युद्धाचा परिणाम म्हणून लोखंडाचे दर वाढले. त्यामुळे नांगराचा फाळ ५८ हजाराहून ६० हजार रुपयांवर गेले आहे. पेरणी यंत्राची किंमतही वाढली आहे.
शेती अवजाराचे दर वाढल्याने ग्रामीण भागातील अवजार बँकावरही काही शेतकरी अवलंबून आहेत. ज्यांची पेरणी बैलाच्या आधारे केली जाते, त्यांना पेरणीसाठी लागणारे मनुष्यबळ मिळत नसल्याचे चित्र आहे. पूर्वी गावात १५ – २० जणांना चढ्यावर मूठ धरता येत असे. पेरताना आडव्या मुठीतून एकेक दाणा सोडण्याचे कौशल्य असणारे आता चार – पाच जणच उरले आहेत. तेही पेरणीसाठी अधिकची रक्कम मागत आहेत. ट्रॅक्टर आणि पेरणीचे दोन्ही खर्च वाढते आहे.
ट्रॅक्टरचालकच घेतात अवजारे
सर्वसाधारणपणे ट्रॅक्टरचालकच अवजारे घेतात. गेल्या काही वर्षात कृषी विभागाने यांत्रिकीकरणाला मोठी तरतूद केली आहे. ट्रॅक्टरबरोबर लागणारी अवजारेही मोठे शेतकरी घेतात. काही ठिकाणी अवजार बँकेतून मोठे शेतकरी आणि त्यांचे नातेवाईक शेतीकामासाठी सामूहिक अवजारे वापरतात. या वर्षी अवजारे आणि ट्रॅक्टरच्या किंमतीमध्येही वाढ झाली आहे.
‘‘वाढलेले स्टीलचे दर आणि युद्धजन्य स्थितीमध्ये वाहन उद्योगातील उत्पादन खर्चात झालेली वाढ लक्षात घेता टॅक्ट्ररच्या किंमतीमध्ये वाढ करण्याचा निर्णय कंपन्यांनी वितरकांना कळवला आहे. अवजारांच्या किंमतीमध्येही थोडी वाढ दिसून येत आहे. एका ट्रॅक्टरची किंमत साडेआठ लाख रुपयांच्या घरात असून त्यात नव्याने तीन टक्के वाढ हाेईल.
रमेश पाटील, ट्रॅक्टर विक्रेते.
