नांदेड: किनवट तालुक्यातील सहस्रकुंड धबधबा येथील महादेवाचे दर्शन घेऊन तेलंगणाकडे परतणाऱ्या भाविकांची कमांडर जीप झाडावर आदळून तीन भाविकांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी संध्याकाळी ८च्या सुमारास तोटंबा गावाजवळील घाट भागात घडली. या अपघातात सात जण गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी तेलंगणा राज्यात हलविण्यात आले आहे.
तेलंगणा राज्यातील कुबेर मंडळातील पारडी येथील रहिवासी असलेले भाविक कमांडर जीपने सहस्रकुंड धबधबा येथे महादेवाच्या दर्शनासाठी आले होते. दर्शन घेऊन परत जात असताना तोटंबा घाटाच्या खाली चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कमांडर जीप रस्त्यालगतच्या झाडावर जाऊन आदळली. या भीषण धडकेत वाहनाचा चक्काचूर झाला.या अपघातात तिघा जणांचा जागीच मृत्यू झाला. मृत भाविक तिघेही तेलंगणा राज्यातील कुबेर मंडळातील पारडी येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले. अपघातात मृत्यू पावलेल्या लोकांची नावे अद्याप पर्यंत कळू शकली नाहीत.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच तोटंबा परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू करून वाहनातील जखमींना बाहेर काढले. अपघातातील सात जण गंभीर जखमी असून त्यांना तातडीने उपचारासाठी तेलंगणा राज्यात हलविण्यात आले.अपघाताची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह रस्त्यावर पडलेल्या अवस्थेत आढळून आल्याने घटनास्थळी हृदय पिळवटून टाकणारे दृश्य निर्माण झाले होते. या घटनेमुळे तोटंबा परिसरासह तेलंगणातील पारडी गावावर शोककळा पसरली आहे.अपघात नेमका कशामुळे झाला, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नसून पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
