छत्रपती संभाजीनगर : धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर, उमरगा आणि लोहरा या तीन तालुक्यांसाठी द्यावयाच्या २.२४ अब्ज घनफुट पाणी वापर व्हावा म्हणून प्रयत्न सुरू असताना शेतकऱ्यांनी अडवणूक सुरू केली आहे. भूसंपादनाची सर्व रक्कम सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात भरुनही ती रक्कम ती घेण्यास नकार दिला जात आहे. त्यामुळे अडकून राहिलेल्या कामांची पूर्तता करण्यासाठी पोलीसांची मदत घेतली जाणार असल्याचे माहिती कृष्णा मराठवाडा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता अमोल नाईक यांनी ‘ लोकसत्ता ’ शी बोलताना सांगितले.
कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पांतर्गत धाराशिव जिल्ह्यासाठी २.२४ अब्ज घनफुट पाणी सिंचनासाठी उपलब्ध होणार आहे. सात टीएमसी पाण्यापैकी २.२४ पाणी उपलब्ध होण्याची शक्यता नजरेच्या टप्प्यात आला असताना शेतकऱ्यांनी संपादनावरुन अडवणूक सुरू केली असल्याने पोलीस बंदोबस्त घेतला जात आहे.
आतापर्यंत ६०० हेक्टर भूसंपादन करण्यात आले असून केवळ नऊ ते १० हेक्टर संपादनासाठी सारे अडून राहिले आहे. त्यामुळे सांगोला व माढा भागातील शेतकऱ्यांकडून होणारी अडवणूक थांबवावी अशी विनंती सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. बदली होण्यापूर्वी कुमार आर्शीवाद यांनी यांनी तशी परवानगी दिल्याने आता भूसंपादनाचे प्रश्न पोलीस बंदोबस्तामध्ये हाताळले जातील, असे सांगण्यात आले आहे.
थेट खरेदीद्वारे भूसंपादनास असलेला तीव्र विरोध व या अनुषंगाने उच्च न्यायालयामध्ये दाखल याचिकांमुळे या योजनेसाठी ज्या गटातून खोदण्याची प्रक्रिया करायची होती रखडली आहे. आता या कामात पोलिसांचे सहकार्य घेतले जाणार आहे. कृष्णा मराठवाडा योजनेमधील उपसा सिंचन योजनातील पडसाळी, सावरगाव, सिंदफळ इत्यादी ठिकाणची स्थापत्य विद्युत व यांत्रिकीशी संबधित कामे पूर्ण झाली आहेत. तर पांगरदरवाडी या ठिकाणचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे.
पंपगृहाचे कामही ७५ टक्के पूर्ण झाले असून हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचा मानस असल्याचे अधिकारी सांगत आहेत. थोडसे काम पण अडवणुकीमुळे पाणी योजना रखडल्याचे सांगण्यात येत आहे.
