छत्रपती संभाजीनगर : रस्त्याच्या कडेला दुचाकी घेऊन उभ्या असलेल्या बाप-लेकाला भरधाव कारने जोराची धडक दिल्याने दोघांचाही मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातील रेतू उमरगा पाटीजवळ रात्री घडली आहे.

मृतांमध्ये रेतू उमरगा येथील उपसरपंच अंकुश विश्वनाथ गित्ते (वय ५०) आणि त्यांच्या मुलाचा समावेश आहे. अंकुश गित्ते आणि त्यांचा मुलगा ओमकार गित्ते हे शेतातून घराकडे जात असताना रेतू उमरगा पाटीजवळ दुचाकीसह रस्त्याच्या कडेला थांबले होते. यावेळी मुखेडकडून येणाऱ्या भरधाव कारने (एमएच-२४-२२९४) त्यांना जोराची धडक दिली. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने हाडोळती येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी अहमदपूर येथे हलविण्यात आले; मात्र तेथील डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले आहे. मारुती कार रस्त्याच्या बाजूच्या खड्ड्यात जाऊन कोसळली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.